यवतमाळ : केंद्र सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईने गृहिणींचे स्वयंपाकघर विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आज सोमवारी येथील संविधान चौकात चूल पेटवून नागरिक व प्रशासनास झुणका भाकर वाटून आंदोलन केले.

‘नरेंदर… कब मिलेगा सिलेंडर?’

यवतमाळच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात
परराष्ट्र धोरणावर कडाडून टीका करण्यात आली. देशातील सद्यस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चुकीची विदेश नीती जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी ‘नरेंदर… कब मिलेगा सिलेंडर?’ अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध केला.

अमेरिकेच्या दबावामुळे इंधन टंचाई

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारताचा जुना मित्र देश असलेल्या इराणला डावलल्यामुळे देशात अभूतपूर्व गॅस टंचाई निर्माण झाली आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या असून सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. ‘उज्ज्वला’ योजनेच्या नावाखाली स्वप्न दाखवणाऱ्या सरकारने सामान्य गृहिणींना पुन्हा एकदा धुराच्या चुलीकडे वळवले आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.

संविधान चौकात पेटली चूल!

यवतमाळच्या संविधान चौकात मोठ्या संख्येने जमलेल्या महिला कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावर चूल पेटवून भाकरी थापल्या. गॅस सिलेंडर परवडत नसल्याने आम्हाला पुन्हा लाकडावर स्वयंपाक करावा लागत आहे, हा संताप या कृतीतून व्यक्त करण्यात आला. डॉ. नीरज वाघमारे यांनी गळ्यात गॅस सिलेंडरची माळ घालून सरकारचा निषेध केला. आंदोलकांनी ‘झुणका-भाकर’ तयार करून त्याचे वाटप केले.

जिल्हाधिकाऱ्यांना झुणका-भाकरीची भेट

नेहमीच्या निवेदनांपेक्षा वेगळी वाट धरत, वंचितच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना जनतेचे मुख्य अन्न असलेल्या झुणका-भाकरीची भेट दिली. महागाईमुळे सामान्यांना केवळ मीठ-कांदा आणि भाकरीवरच समाधान मानावे लागत असल्याचे यातून अधोरेखित करण्यात आले. गळ्यातील रिकामे सिलेंडर आणि हातातील भाकरी हे या आंदोलनाचे मुख्य आकर्षण ठरले.

जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर

आज इंधन टंचाईमुळे गरिबांची रोजीरोटी संकटात आहे. रिक्षाचालक, छोटे हॉटेल व्यावसायिक आणि सामान्य जनता महागाईने होरपळत असताना इतर कोणताही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरायला तयार नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडी सदैव जनतेच्या हक्कासाठी लढत राहील, असे वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नगरसेविका मीरा वीर, जिल्हा महासचिव अशोक कुमार कयापाक, संजय इंगळे, शिवदास कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोले, शैलेश भानवे, सचिन राऊत, आनंद भगत, गजानन कोकाटे, शहराध्यक्ष प्रसन्नजीत भवरे, प्रमोद पाटील, विलास वाघमारे, शेतकरी चळवळीचे प्रा. पंढरी पाठे, रणधीर चव्हाण यांसह महिला पदाधिकारी पुष्पाताई शिरसाठ, भारती सावते, करुणा चौधरी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.