यवतमाळ : राजकीय वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत आज नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी ‘महायुती धर्म’ पाळत या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे यवतमाळ विधान परिषदेची जागा आता बिनविरोध झाली असून शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाची औपचारिक घोषणा तेवढी शिल्लक आहे.
कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा, पण ‘महायुती’ सर्वोच्च
यवतमाळ जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत व्हावा, यासाठी यवतमाळ विधानपरिषदेची जागा भाजपलाच मिळावी, अशी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती. मात्र, महायुतीच्या जागावाटपानुसार ही जागा शिवसेनेच्या (शिंदे गट) वाट्याला गेली आहे. पक्षादेश शिरसावंद्य मानत आपण महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देत, दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे नितीन भुतडा यांनी जाहीर केले. ‘महायुती धर्म’ पाळणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढवणार नाही, असे भुतडा यांनी स्पष्ट केले.
दुष्यंत चतुर्वेदी अविरोध
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडून, घोडेबाजाराकडे झुकलेली ही निवडणूक चक्क बिनविरोध होत असल्याने मतदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. नगरसेवक ही निवडणूक चुरशीची व्हावी म्हणून अपेक्षा बाळगून होते. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराब कांबळे यांनी निवडणुकीतून माघार घेत, महायुतीची अर्धी लढाई सोपी केली. त्यानंतर भाजपचे बंडखोर नितीन भुतडा यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून थेट मुंबईतून सूत्रे हलली. आज गुरुवारी नितीन भुतडा यवतमाळात पोहोचताच माजी आमदार मदन येरावार यांच्याशी चर्चा करून माघार घेत असल्याचे जाहीर केले. यासोबतच अपक्ष उमेदवार सय्यद फारुख यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा उमेदवार म्हणून लढावे यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. मात्र त्यांनीही निवडणुकीतून माघार घेतली.
दुसरे अपक्ष साजिद बेग यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे रिंगणात आता केवळ महायुतीकडून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून, चतुर्वेदी यांच्या विजयाची औपचारिक घोषणा तेवढी बाकी आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगास पाठवून चतुर्वेदी यांना निकालाच्या दिवशी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
मंत्री संजय राठोड यांची चाणक्य नीती
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे खऱ्या अर्थाने निवडणूक नीतीकार ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजपाने जिल्ह्यात कोंडी केल्यानंतर आणि पुरेसे संख्याबळ नसून महाविकास आघाडीने घेतल्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी अत्यंत कौशल्याने आधी महाविकास आघाडी आणि नंतर मित्रपक्ष भाजपच्या उमेदवारास माघार घेण्यास प्रवृत्त केले. परिणामी येथे शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला.
अलीकडच्या काळात विधान परिषद निवडणुकीत मतदारांना घोडेबाजार आणि रिसॉर्ट सवयी जडल्या असताना ही निवडणूक बिनविरोध झाल्याने संजय राठोड यांचे राजकीय वर्चस्व वाढण्यासोबतच रणनीतीकार म्हणून लौकिक झाला आहे. ‘निवडणूक झाली असती तरी विजय महायुतीच्या उमेदवाराचाच झाला असता. मात्र निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुरुवातीपासून केलेले प्रयत्न आणि त्याला मित्र पक्षासह विरोधी पक्ष, अपक्ष यांनी साथ दिल्याने, शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा बिनविरोध विजय झाला’, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिली.
