यवतमाळ : राज्याच्या राजकीय वर्तुळात अत्यंत मोठी आणि धक्कादायक घटना आज बुधवारी यवतमाळ येथे घडली. यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीला (मविआ) मोठा राजकीय फटका बसला असून, आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली आहे. विजयासाठी आवश्यक असणारे संख्याबळ कागदावर जुळत नसल्याने lहा निर्णय घ्यावा लागल्याचे स्वतः कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारानेच माघार घेतल्यामुळे स्थानिक पातळीवर मविआच्या रणनीतीचे पार धिंडवडे निघाले असून दोन दिवसांपूर्वी विजयाचा निर्धार करणारे आघाडीचे नेते तोंडघशी पडले आहेत.
पुरेसे संख्याबळ नसल्याचे कारण
साहेबराव कांबळे यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना, ‘काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माझ्यासारख्या एका मागासवर्गीय कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर केली होती. एका मागासवर्गीय माणसाला विधानपरिषदेचे तिकीट मिळणे ही माझ्यासाठी आणि समाजासाठी अत्यंत अभिमानाची बाब होती. परंतु, प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला असता, महाविकास आघाडीकडे विजयासाठी आवश्यक असणारे संख्याबळ पुरेसे नाही.
निवडणूक जिंकण्यासाठी केवळ तोंडी किंवा लेखी बोलून चालत नाही, तर त्यासाठी ‘साम, दाम, दंड, भेद’ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेसे ‘संख्याबळ’ लागते, जे आमच्याकडे नाही’, त्यामुळे माघार घेत असल्याचे जाहीर केले. मात्र कांबळे यांच्या माघारीमागे मोठे राजकीय नाट्य असल्याची चर्चा आहे. कांबळे यापूर्वी शासकीय सेवेत होते. तेथील काही धागेदोरे पकडून त्यांना कारवाईच्या कचाट्यात आणण्याची भीती रणनीती सत्ताधारी पक्षाने दाखविण्याची चर्चा आहे. लवकरच साहेबराव कांबळे यांचा शिवसेना पक्ष प्रवेश असल्याचेही सांगितले जात आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीविना केवळ नगरसेवकांचा कौल
यावेळच्या यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती अस्तित्वात नसल्याने केवळ नगरसेवकच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात एकूण ४४६ मतदार नगरसेवक असून, त्यांच्याच मतांवर या निवडणुकीचा फैसला होणार आहे. या अधिकृत आकडेवारीवर नजर टाकल्यास महायुतीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट दिसते.
महायुतीकडे भाजप (१२५), शिवसेना (१०७) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (२९) असे मिळून तब्बल २६१ मतांचे भक्कम संख्याबळ आहे. याउलट, महाविकास आघाडीत काँग्रेस (९९), शिवसेना उद्धव ठाकरे गट (२३) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (३) अशी मिळून अवघी १२५ मते आहेत. महायुती आणि मविआच्या अधिकृत मतांमध्ये तब्बल १३६ मतांचा मोठा फरक असल्याने मविआचा पराभव स्पष्ट दिसत होता. याशिवाय एमआयएम (७), वंचित (५), जनशक्ती (२०) आणि तब्बल २० अपक्ष नगरसेवकांची मतेही या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.
दुष्यंत चतुर्वेदी हेच महायुतीचे उमेदवार
कांबळे यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, जर मविआने फॉर्म भरला नसता तर निवडणूक बिनविरोध झाली असती आणि फॉर्म भरून तो तसाच ठेवून पराभव पत्करावा लागला असता, तरीही आघाडीचा अपमान झाला असता. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच माघार घेण्याचा मार्ग निवडला, असे त्यांनी सांगितले. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे दुष्यंत चतुर्वेदी हे एकमेव प्रबळ उमेदवार आहेत.
भाजपचे नितीन भुतडा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असली तरी, आज मुंबई येथे होणाऱ्या बैठकीनंतर ते माघार घेण्याची चर्चा आहे. शिवाय महायुतीकडून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात यवतमाळ येथे दुष्यंत चतुर्वेदी हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भुतडा पक्षासोबत बंडखोरी करून राजकीय उत्कर्षावर धोंडा पाडून घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उमेदवारी माघारीचा धुरळा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर नक्कीच दूरगामी परिणाम करणारा ठरेल. साहेबराव कांबळे यांच्या या धक्कादायक माघारीमुळे महाविकास आघाडीच्या गोटात कमालीची शांतता पसरली असून, सत्ताधारी महायुतीचा मार्ग आता पूर्णपणे सुकर झाला आहे.
