यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीने नाट्यमय वळण घेतले आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीत अधिकृत उमेदवारासाठी धावपळ सुरू आहे. साहेबराव कांबळे यांनी ऐनवेळी तोंडघशी पाडल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी तातडीने ‘डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न सुरू केले आहेत. दारव्हा येथील काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि सध्या अपक्ष म्हणून रिंगणात असलेले उमेदवार सय्यद फारुख यांच्या गळ्यात मविआच्या पुरस्कृत उमेदवारीची माळ घालण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
अपक्ष सय्यद फारुख मविआचे ‘संकटमोचक’ ठरणार?
कांबळे यांनी माघार घेणे हा महाविकास आघाडीसाठी, विशेषतः काँग्रेस पक्षासाठी अत्यंत मोठा आणि मानहानीकारक धक्का मानला जात आहे. मविआच्या सर्व बड्या नेत्यांच्या उपस्थितीत आणि पूर्ण ताकदीनिशी कांबळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता, त्यामुळे ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी अटीतटीची होईल असे चित्र होते.
मात्र, कांबळे यांच्या अचानक माघार घेण्याच्या निर्णयामुळे काँग्रेस बॅकफूटवर आली असून पक्षात तीव्र संताप व नाचक्कीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे अत्यंत निकटर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले आणि या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सय्यद फारुख यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी तातडीने बुलढाण्याकडे रवाना झाले. स्वतः सय्यद फारुख यांनीही या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, ते आता काँग्रेसचा अधिकृत चेहरा राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या राजकीय खलबतांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मविआच्या नगरसेवकांमध्ये कमालीची अस्वस्थता
विधान परिषद निवडणुकीतील आर्थिक गणिते आणि तथाकथित ‘घोडेबाजार’ हा राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय असतो. अशा परिस्थितीत अधिकृत उमेदवारानेच माघार घेतल्याने महाविकास आघाडीच्या गोटातील नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांना तर हा निर्णय पचवणे कठीण जात आहे. आता आमचा अधिकृत पर्याय कोण? असा संतप्त सवाल या लोकप्रतिनिधींकडून विचारला जात आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी यवतमाळमध्ये एका तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याचे खासदार संजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
महायुतीतही बंडखोरीचे ग्रहण; आज चित्र स्पष्ट होणार
दुसरीकडे, महायुतीमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. यवतमाळची ही जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला गेली असून तेथून दुष्यंत चतुर्वेदी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी पक्षादेश डावलून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे साजीद बेग यांनीही अपक्ष अर्ज भरला आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी संयुक्त पत्रक काढून दुष्यंत चतुर्वेदी हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर करून बंडखोरांना कडक इशारा दिला आहे. आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, दुपारनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
