यवतमाळ : तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत सोमवारी दुपारी सहा ते सात फूट लांबीचा धामण साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, ज्या खोलीत अंगणवाडीचे चिमुकले विद्यार्थी बसतात, त्याच वर्गात साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने साप आढळला त्यावेळी अंगणवाडीतील बालके वर्गाबाहेर खेळत असल्याने संभाव्य धोका टळला. मात्र, या घटनेमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

एकाच खोलीत वर्ग, पोषण आहार

विठ्ठलवाडीच्या या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत. दोन वर्गखोल्या असून एका वर्ग खोलीत पहिली ते पाचवीचे सुमारे १३ विद्यार्थी शिक्षण घेतात. दुसऱ्या वर्गखोलीत अंगणवाडी भरते. अंगणवाडीच्याच खोलीत एकीकडे विद्यार्थी बसतात तर, दुसरीकडे या चिमुकल्यांसाठी पोषण आहार शिजतो. सोमवारी दुपारी अंगणवाडीच्या खोलीतून आवाज येत असल्याने शिक्षकांनी पाहणी केली असता छताच्या खालच्या भागात मोठा साप आढळला. सुरुवातीला उंदीर किंवा अन्य प्राणी असल्याचा अंदाज शिक्षकांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्ष साप दिसताच सर्वांचीच पाचावर धारण बसली.

साप जंगलातून आल्याचा संशय

शाळेच्या मागील बाजूस जंगलाचा परिसर असल्याने साप छताच्या माध्यमातून इमारतीत आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती गावात पसरताच पालक आणि ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली. सापाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तोपर्यंत साप निघून गेला होता. त्यामुळे साप पुन्हा शाळेच्या परिसरात आल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय, हा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. सुदैवाने यावेळी पोषण आहार शिजवण्याचे काम सुरू नव्हते.

गडचिरोलीची घटनेची पुनरावृत्ती टळली

विठ्ठलवाडीतील या घटनेमुळे दोन महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत घडलेल्या सर्पदंशाच्या घटनेची आठवण ताजी झाली. १० ऑगस्ट रोजी रात्री वसतिगृहात झोपलेल्या सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला. त्यापैकी तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य विद्यार्थिनींवर उपचार करण्यात आले. या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही स्वतःहून दखल घेतली होती. गडचिरोलीतील घटनेनंतर आश्रमशाळांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील आश्रमशाळांचे सुरक्षा ऑडिट आणि आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. विठ्ठलवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील घटना त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण शाळांमधील भौतिक सुरक्षेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करणारी ठरली आहे.

दीपके यांच्या ‘स्कूल ठीक करो’ मोहिमेचा मुद्दाही चर्चेत

ग्रामीण सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न सध्या अभिजीत दीपके यांच्या ‘स्कूल ठीक करो’ मोहिमेमुळेही चर्चेत आहे. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावातील जिल्हा परिषद शाळेची पाहणी करून त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली. जिल्हा परिषद शाळेतील पाणी, स्वच्छतागृह, बेंच, खिडक्या आणि इतर मूलभूत सुविधांची स्थिती तपासून त्याची नोंद करण्यासाठी चेकलिस्ट तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. पुढील टप्प्यात राज्यातील विविध गावांमधील शाळांची पाहणी करून माहिती संकलित करण्याची भूमिका त्यांनी मांडली. विठ्ठलवाडीतील सापाच्या घटनेने याच प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधले आहे. शाळेची इमारत सुरक्षित आहे का, छताला किंवा भिंतींना भगदाडे आहेत का, परिसराला संरक्षक भिंत अथवा कुंपण आहे का, शाळेच्या आजूबाजूची झाडेझुडपे स्वच्छ आहेत का, याची नियमित पाहणी होणे आवश्यक आहे. मुलांना शिक्षण देणारी शाळा त्यांच्या सुरक्षिततेचीही जागा असणे अपेक्षित आहे. त्यामुळे विठ्ठलवाडीच्या घटनेनंतर शिक्षण विभागाने शाळेच्या संपूर्ण इमारतीचे आणि परिसराचे सुरक्षा परीक्षण करावे, अशी पालकांची मागणी आहे. गडचिरोलीसारखी दुर्घटना घडल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा त्याआधीच धोके ओळखून शाळा सुरक्षित करणे गरजेचे आहे. विठ्ठलवाडीतील सापाची घटना ही मोठी दुर्घटना टळल्याचा इशारा मानून प्रशासन आता तरी जागे होणार का, हा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.