यवतमाळ : शिक्षण क्षेत्राला आणि गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घाटंजी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आली आहे. शाळेत सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्वतः मुख्याध्यापकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ज्याने संस्कार करायचे, तोच ’भक्षक’बनल्याने पालकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. या नराधम मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. किशोर उत्तमराव मालवीय (४३, रा. चांदूरेनगर, यवतमाळ) असे या विकृत मुख्याध्यापकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नराधम गेल्या वर्षभरापासून विद्यार्थिनिशी दुष्कृत्य करत होता. त्याने १ मे २०२५ रोजी शाळेच्या ’डिजिटल रूम’मध्ये या चिमुकलीवर पहिल्यांदा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याची हिंमत वाढली. गुरुवारी, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास त्याने मुलीला काहीतरी आमिष दाखवून स्वतःच्या ’झायलो’कारमध्ये बसवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराने पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. अखेर तिने धीर एकवटून घरी घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला.
आपल्या पोटच्या गोळ्यावर झालेला अत्याचार ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पीडितेसह घाटंजी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आणि पोक्सो अन्वये गुन्हे दाखल केले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शनिवारी रात्रीच आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली. ज्या कारमध्ये मुख्याध्यापकाने दुष्कृत्य केले, ती कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राठोड करीत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपी नराधम शिक्षकाला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी पालकांनी लावून धरली आहे.
आणखी कोणासोबत असे घडले का?
आरोपी मुख्याध्यापकाची वागणूक आणि गुन्ह्याची पद्धत पाहता, त्याने शाळेतील इतर विद्यार्थिनींसोबतही असे गैरकृत्य केले असण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस आता कसून तपास करत आहेत. जर इतर कोणत्याही विद्यार्थिनीसोबत असा प्रकार घडला असेल, तर त्यांनी न घाबरता पुढे येऊन पोलिसांना माहिती द्यावी. त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल,‘ असे आवाहन घाटंजी पोलिसांनी केले आहे.
