लोकसत्ता टीम वर्धा : धोक्याचा असणारा पावसाचा यलो अलर्ट आज देण्यात आल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. सलग पाच दिवसापासून जिल्ह्यात जोरधार सुरू आहे. नदी, नाले, ओढे भरभरून वाहू लागले आहे. जुलै महिन्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे अनेक गावांना पाण्याचा विळखा पडलेला. सरूळ, आलमडोह, निमसडा, आलोडा, डिगडोह या गावाचा संपर्क तुटला आहे. त्याची पाहणी जिल्हा परिषदेच्या उपमुख्याधिकारी ज्ञानदा फणसे यांनी केली. घोडेगाव येथील नाल्याला पूर आल्याने सेंद्री सोनोरा गाव पाण्याने वेढल्या गेले. आज यलो अलर्ट असल्याने वाहत्या पुलावरून प्रवास नं करण्याचा ईशारा दिला. धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून बोर ५२, निम्न वर्धा ६३, पोथरा १००, पंचधारा १००, डोंगरगाव १००, मदन ८५, उन्नई १००, लाल नाला ५४, कार १००, सुकळी १००, नांद ३७, वडगाव ६५, उर्धे वर्धा ५९, बेंबळा ४८ टक्के भरले आहे. बहुतांश धरणातून पाण्याचा विसर्ग सूरू असल्याने लगतच्या गावातील नदी नाले पुरमय झाले. देवळी तालुक्यातील सरूळ, बोरगाव ते आलोडा, भोजनखेडा, निमसडा येथील पुलावरून पाणी वाहत आहे. कारंजा तालुक्यातील ढगा ते ब्राम्हणवाडा रस्ता बंद पडला. आर्वी व वर्धा तालुक्यातील काही घरांची पडझड झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. आणखी वाचा-चंद्रपूर: एका हातात चप्पल, दुसऱ्या हाताची साखळी; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना… सततची झड रस्ते खरवडून काढणारी ठरली. बांधकाम विभागाच्या केवळ एकट्या वर्धा उपविभागात २२ रस्ते होत्याचे नव्हते झालेत. या वाहून गेलेल्या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी ५१ लाख रुपयाची गरज आहे. कायमस्वरूपी दुरुस्ती करायची असल्यास सव्वा कोटी रुपयाची गरज भासणार, असे खात्याने स्पष्ट केले. जिल्ह्यातील काही महसूल मंडळात विक्रमी पावसाची नोंद झाली. आर्वी तालुक्यातील ६ मंडळात २६ मिमी, कारंजा ४ मंडळात ११, आष्टी ४ मंडळात १७, वर्धा ७ मंडळात १५, सेलू ५ मंडळात १२, देवळी ६ मंडळात ४३, हिंगणघाट १० मंडळात २२, समुद्रपूर ८ मंडळात १२ मिमीची नोंद झाली असून जिल्ह्यातील ४८ मंडळात एकूण २०. ७ मिमीची सरासरी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी दिवसभर ते आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. काल सायंकाळी चांगलाच बरसल्याने जनजीवन ठप्प पडले होते. आज परत यलो अलर्ट असल्याने ग्रामीण भाग घायकुतीस आल्याचे चित्र आहे. हजारो एकरातील पिकांना या सततच्या वृष्टीचा फटका बसत असल्याने त्वरित पंचनामे करीत भरपाई मिळण्याची मागणी होवू लागली आहे.