नागपूर : पूर्व मोसमी पावसाने गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात हजेरी लावली आहे. विशेषकरुन पुण्यात झालेल्या पावसामुळे शहर तुंबले आणि तारांबळ उडाली. आजदेखील राज्याच्या विविध भागात पूर्व मोसमी पावसाची हजेरी लागणार असून हवामान खात्याने संपूर्ण राज्यातच ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

पूर्व मोसमी पावसाला पोषक असे वातावरण राज्यात तयार झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे विदर्भ वगळता राज्यातील इतर शहरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. कमाला तापमानात वेगाने घट होताना दिसून येत आहे. राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे.

हेही वाचा – चालकाला डुलकी लागली अन ‘समृद्धी’वर बस उलटली

पुण्यामुंबईसह सोमवारी रात्री नागपुरात देखील वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर आजदेखील राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या शहरात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात देखील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदर्ग, नाशिक, अहमनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर येथेही विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई उपनगर, पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव येथे हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून राज्यात ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

हेही वाचा – वाशिम : घरात एकट्या असलेल्या ८ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, वज्रदेही महिला विकास संघाचा मोर्चा

नैऋत्य मोसमी वारे गोव्यात दाखल झाले असतानाच बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात वादळीवाऱ्यासह पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोसमी पाऊस अरबी समुद्राच्या मध्यभागात सक्रीय झाला आहे. तळ कोकणासह बहूतांश ठिकाणी वादळी पावसाची हजेरी लागली. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यात पाऊस कायम राहील, असा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात बऱ्यापैकी गारवा आहे. विदर्भात मात्र, अजूनही कमाल तापमान वाढलेलेच आहे. बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा ४० ते ४१ अंश सेल्सिअसदरम्यान आहे.

तर किमान तापमानातही फार घट नाही. त्यामुळे अजूनही विदर्भात उकाडा कायमच आहे. दरम्यान, राज्यात आज वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असतानाच वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास राहील, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.