अफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस घेणे बंधनकारक आहे. परंतु, मध्य भारतातील एकमात्र डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील केंद्रात लसीचा ठणठणाट आहे. येथे नागरिकांना पायपीट करूनही लस मिळत नाही. दुसरीकडे येथील एका खासगी केंद्रात लसीसाठी ६ ते ७ हजार रुपयांची मागणी केली जात आहे. त्यामुळे नागरिक मुंबई, पुणे, हैद्राबादच्या केंद्रावर लसीसाठी चाचपणी करताना दिसत आहे.
अफ्रिकन देशात मोठ्या प्रमाणावर गंभीर समजला जाणारा पिवळा ताप आढळतो. या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांनाही पिवळ्या तापाची लागण होण्याची शक्यता असते. तेव्हा आफ्रिकन देशात जाणाऱ्यांना या आजारापासून वाचण्याकरिता पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस बंधनकारक आहे. विदर्भासह राज्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड येथीलही तरुण व इतरही गटातील नागरिक मोठ्या संख्येने रोजगार, व्यवसाय, पर्यटनासह इतरही काही कामासाठी जातात. अफ्रिकन देशात जाण्यासाठी पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस घेतल्याशिवाय ‘व्हिजा’ मिळत नाही.

हेही वाचा >>> लहानपणी झालेल्या बलात्कारावर सख्ख्या भावाविरुद्ध तब्बल ३१ वर्षांनी महिलेची पोलिसांत तक्रार

दरम्यान, मध्य भारतातील मोठ्या संख्येने नागरिक या लसीसाठी डागा या शासकीय केंद्रात येतात. येथे नाममात्र ३५० रुपयांत ही लस उपलब्ध आहे. परंतु १६ सप्टेंबर २०२२ पासून येथे सगळ्या लसी संपल्या आहेत. त्यामुळे येथे लसीसाठी येणाऱ्यांना आल्यापावली परतावे लागते. दरम्यान, नागरिकांच्या व्यथा बघत डागा रुग्णालयाकडून यापूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि त्यांना लसपुरवठा होणाऱ्या हिमाचल प्रदेशातील कसोली येथील संबंधित अधिकाऱ्यांसी संपर्क साधला गेला. लसींची मागणी व अग्रीम रक्कमही देऊ केल्या गेली. परंतु त्यांना तेथे लस उपलब्ध नसल्याचे कळवले गेले. तर दुसरीकडे नागरिकांना शहरातील एका खासगी केंद्रात या लसीसाठी तब्बल ६ ते ७ हजार रुपये मागितले जात आहे. त्यामुळे नागरिकांना लसीसाठी मुंबई, पुणे, हैद्राबाद येथील शासकीय केंद्रात लसींची चाचपणी करावी लागत आहे. काहींना तेथे लस असल्याचे कळल्यावर ते तेथे जाऊन ही लस लावून येत आहेत. त्यामुळे नागरिकांचा हा मनस्ताप कोण कमी करणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

अफ्रिकन देशात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लस मिळायला हवी. त्यासाठी लसींची मागणी नोंदवली आहे. परंतु, तूर्तास तेथे उत्पादन बंद असल्याने ऑक्टोबरपूर्वी पुरवठा शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.- डॉ. सीमा पारवेकर, वैद्यकीय अधीक्षक, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात, नागपूर.