Premium

सोयाबीनवर पिवळा मोझॅकचे आक्रमण, चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा; पालकमंत्री मुनगंटीवार यांची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील ६७.७६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. वरोरा, भद्रावती, चिमुर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये हे पीक घेतले जाते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला.

Yellow mosaic Chandrapur
सोयाबीनवर पिवळा मोझॅकचे आक्रमण, चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा; पालकमंत्री मुनगंटीवार यांची मागणी (image credit – loksatta graphics/pixabay)

चंद्रपूर : सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हातची पिके गेलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी व नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सरसावले आहेत. शेतीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर चंद्रपुरात प्रथमच हा रोग आढळून आल्याने एक विशेष पॅकेज चंद्रपूर जिल्ह्यासाठी जाहीर करावा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर जिल्ह्यातील ६७.७६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. वरोरा, भद्रावती, चिमुर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये हे पीक घेतले जाते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहिमही हाती घेतली. परंतु १५ ते १८ सप्टेंबरच्या आसपास अचानक सोयाबीनचे पिक काळवंडले. पावसाचा खंड, वाढलेले उष्णतामान आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हे घडल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – गडचिरोली : झेंडेपार लोहखाणीसंदर्भातील जनसुनावणी रद्द करा; शिष्टमंडळाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना साकडे

चंद्रपूर जिल्ह्यातील ही परिस्थिती कळताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोना, पांढरपौनी, हरदोणा ( खु.) येथील शेतशिवरात सोयाबीन पिकावरील रोगामुळे नुकसानग्रस्त भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनाही पिकांवर मळकुज, खोडकुज व रायझोक्टोनिया एरीयल ब्लॉईट या रोगांचा प्रादुर्भाव आढळला. या रोगामुळे दोनच दिवसांत सोयाबीनचे पीक पिवळे पडले होते. या पाहणीच्या वेळी जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, सुनिल उरकुडे, अजय राठोड, अरुण मस्की, हरीदास झाडे, वामन तुरानकर, दिलीप गिरसावळे, कृषी सहाय्यक डांगे हे उपस्थित होते.

हवामान व रोगांच्या प्रादुर्भावामुळे मुनगंटीवार यांना अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव व डोळ्याच्या कडा पाणावलेल्या दिसल्या. त्यामुळे त्यांनी तातडीने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे नुकसाभरपाई मिळण्यासाठी साद घातली. कृषिमंत्री धनंजयजी मुंडे यांनाही पत्र पाठविले. मृदा संतुलनात मोठा बिघाड निर्माण झाला आहे. हे संतुलन पुन्हा निर्माण करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे. सोयाबीनवर तीन प्रकारचे रोग सध्या आहेत. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना बोलावून या रोगांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे यावेळी मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. पीक नुकसानीसंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत. नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार करताना तो पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने असला पाहिजे, शेतकऱ्यांच्या फायद्याचा असला पाहिजे अशा सूचना प्रशासनाला दिल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – वन्य प्राण्यांपासून बचावासाठी शेतीच्या कुंपणात सोडलेल्या जिवंत विद्युत प्रवाहामुळे वर्षभरात १३ नागरिकांनी गमावला जीव

याबाबत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थिती दयनीय झाल्याचे त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. नैसर्गिक आपत्ती व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटाच्या मालिकेत सापडला आहे. त्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढणे नितांत गरजेचे असल्याचे नमूद करीत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची आग्रही मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मागील हरभरा पिकाचेही गारपिटीमुळे नुकसान झाले होते याशिवाय ५० हजार रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांपैकी काहींच्या खात्यात तांत्रिक कारणाने रक्कम जमा झाली नव्हती, ती रक्कम जमा करण्याबाबतही मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांचे लक्ष वेधले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yellow mosaic attack on soybean in chandrapur district sudhir mungantiwar demand to announce a special package for the affected farmers rsj 74 ssb

First published on: 23-09-2023 at 10:03 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा