चंद्रशेखर बोबडे नागपूर : विविध क्षेत्रांतील तरुण कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून यंग आर्टिस्ट शिष्यवृत्ती दिली जाते. पाच वर्षांत या शिष्यवृत्तीच्या प्राप्त लाभार्थ्यांच्या संख्येवर नजर टाकल्यास त्यात कधी वाढ तर कधी घट दिसून येते. २०१८-१९ मध्ये लाभार्थ्यांची संख्या ११५१ होती तर २०२३ मध्ये ती ३५६ होती. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी तरुण कलाकार पात्र ठरत नाही की, अन्य बाबी यासाठी कारणीभूत आहेत, असा सवाल केला जात आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देशभरातील विविध सांस्कृतिक क्षेत्रातील तरुण कलाकारांना (यंग आर्टिस्ट) शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. पारंपरिक कला प्रकारांसह विविध सांस्कृतिक क्षेत्रातील तरुण कलाकार यासाठी पात्र ठरतात. या योजनेअंतर्गत पात्र कलाकाराला पाच हजार रुपये प्रतिमहिना दोन वर्षांसाठी प्रदान केले जाते. यासाठी अर्ज करणारा कलाकार १८ ते २५ वयोगटातील असावा, तो कोणत्याही गुरूकडे किंवा संस्थेकडे किमान पाच वर्षांसाठी प्रशिक्षण घेत असावा या अटी आहेत. अर्जदाराची निवड ही मंत्रालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीद्वारे वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर केली जाते. २०२२-२३ मध्ये तुलनेत घट केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालयाच्या माहितीनुसार २०१८-१९ ते २०२२-२३ (मार्च) पर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त युवा कलाकारांची संख्या पहिल्या चार वर्षांच्या तुलनेत शेवटच्या वर्षांत कमी झालेली दिसते. २०१८-१९ ला ११५१, २०१९-२० मध्ये १०८६ कलाकारांना, २०२०-२१ मध्ये १२६५, २०२१-२२ मध्ये १२९३ आणि २०२२-२३ मध्ये ३९६ युवा कलाकार शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.