लोकसत्ता टीम

नागपूर: नरखेड तालुक्यातील बेलोना ग्राम पंचायत परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होती. या कारवाईला तेथे घर व गोठे असलेल्यांचा विरोध होता. येथे पथक गोठा तोडायला येताच एका तरुणाने स्वत:वर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. त्यात तो ७० टक्के भाजल्याने येथे खळबळ उडाली. या अत्यवस्थ तरुणाला नरखेडच्या ग्रामीण रुग्णालयातून नागपुरातील मेयो रुग्णालयात हलवून दाखल केले गेले.

अरविंद रमेश बांबल (३८) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मौजा बेलोना सर्व्हे नं. २३० हा महाराष्ट्र सरकार झुडपी जंगल म्हणून नमुद आहे. येथे जनावरांना उभे राहण्याकरिता अशी नोंद महसूल विभागाकडे आहे. नरखेड तालुक्यातील बेलोना ग्राम पंचायत परिसरातील पेठ विभागाच्या वार्ड क्र. ३ येथील जागेवर मागील २५ वर्षापुर्वीपासून सहा ते सात कुटुबांनी अतिक्रमण करुन घरे व जनावरांचे गोठे बांधले.

आणखी वाचा-नागपुरात एसटी कामगारांनी वाजवला ढोल… बधिर शासनाला जागे करण्यासाठी घंटीही…

सदर अतिक्रमणाच्या जागेवर ग्राम पंचायतकडून कर लावून त्याची वसुलीही केली जाते. जखमी अरविंदचे वडील रमेश बांबल यांना सदर ग्राम पंचायतकडून अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी १ वाजता ग्राम पंचायत चमूने पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेसीबी, ट्रॅक्टर घेवून अतिक्रमन स्थळ गाठले. येथे बांबल यांच्या कुटुंबियांनी अतिक्रमणाच्या कारवाईला कडाडून विरोध केला. ही कारवाई केवळ रमेश बांबल यांच्या अतिक्रमाणावरच करण्याचा घाट असल्याचाही आरोप कुटुंबियांनी केला. दरम्यान ग्राम पंचायतच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या भागात कारवाई सुरू केली. हे पथक बांबल यांच्या गोठा पाडण्यासाठी येताच अरविंदने गोठ्यात लपवून ठेवलेले पेट्रोल स्वत:चा अंगावर टाकले. त्यानंतर लगेच त्याने स्वत:ला पेटवून टाकले.

अरविंद आगीत सापडल्याचे बघत तेथे खळबळ उडाली. तातडीने उपस्थितांकडून त्याला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु आग विझेपर्यंत अरविंद गंभीररित्या भाजला होता. तातडीने त्याला उपस्थितांकडून जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. येथे प्राथमोपचार करून त्याची प्रकृती गंभीर होत असल्याचे बघत तातडीने त्याला नागपुरातील मेयो रुग्णालयात हलवण्या आले. येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत रुग्णावर उपचार सुरू आहे. दरम्यान अरविंदने स्वत:ला पेटवल्याचे बघत ग्राम पंचायतची अतिक्रमणविरोधा पथकाने येथून काढला पाय घेतला. परंतु ही कारवाई नियमानुसार असल्याचे ग्राम पंचायतच्या अतिक्रमनविरोधी पथकातील अधिकाऱ्यांचे म्हणने होते.

आणखी वाचा- स्वच्छता मानांकनासाठी संघर्ष करणाऱ्या नागपुरात चिकनगुनिया, डेंग्यूचे थैमान

बांबल कुटुंबियांचे गंभीर आरोप..

पावसाळयात अतिक्रमण हटवू नये असा शासनाचा नियम आहे. सोबत झुडपी जंगलावरील अतिक्रमण हटविण्याचा अधिकार केवळ वन विभागाला आहे. या जागेशी ग्राम पंचायतचा संबंध येत नाही. त्यानंतरही ग्राम पंचायतकडून कुणाच्या दबावात अतिक्रमण पाडण्याची कारवाई करत आहे? याची चौकशी करून दोषींवर कारवाईची गरज आहे, असा आरोप बांबल कुटुंबियांनी केला.