यवतमाळ : कॉलेजला जात असल्याचे सांगून घरून गेलेल्या तरुणीने वणी-वरोरा मार्गावरील वर्धा नदीत उडी घेतली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. माधुरी अरूण खैरे (२८) रा. घरकुल कॉलनी, मारेगाव असे या तरुणीचे नाव आहे. पोलीस व प्रशासनाच्या वतीने वर्धा नदीत शोध मोहीम सुरू आहे.

माधुरीचे वडील अरुण खैरे यांचा दहा वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर मार्च महिन्यात तिची आई उषा खैरे यांचा शाळेत कचरा जाळताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून माधुरी आणि तिचा भाऊ यश हे दोघेच घरात राहत होते. माधुरीने वणी येथून डी. फार्म.चे शिक्षण घेतले होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता ती वणी येथे कॉलेजमध्ये जात असल्याचे सांगून घरून गेली. वणीवरून ऑटोरिक्षाने पाटाळा येथे उतरली व आजूबाजुला कोणीही नसल्याचे बघून दुथडी भरून वाहत असलेल्या नदीत उडी घेतली.

हेही वाचा…नागपुरात डेंग्यू, चिकनगुनियाचे थैमान…. ४ हजार ५५७ दूषित भांडी….

काही वेळाने पाटाळा येथे नदीच्या पुलावर माजरी येथील एक दाम्पत्य थांबले असता, त्यांना तेथे मोबाईल, पर्स व चप्पल आढळून आली. यावेळी माधुरीच्या मोबाईलवर फोन आला, तो फोन त्या दाम्पत्याने उचलला व माहिती दिली. नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता माधुरीने वर्धा नदीत उडी घेतल्याचे दिसत आहे. तिचा भाऊ यश खैरे याने वणी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. आई, वडील व आता बहिणीच्या मृत्यूने यश एकाकी पडला आहे. माधुरीन हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत काहीही स्पष्ट नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.