scorecardresearch

“तुमचा काळ संपला, आता नागपुरात येऊन काय…” उद्धव ठाकरेंना बावनकुळेंचा सवाल!

“अजित पवारांनी विदर्भाच्या विकासाविषयी बोलताना आधी आपण सत्तेवर असताना…”, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

“तुमचा काळ संपला, आता नागपुरात येऊन काय…” उद्धव ठाकरेंना बावनकुळेंचा सवाल!
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे विदर्भासाठी काही केले नाही, नागपुरात हिवाळी अधिवेशनाचे आयोजन केले नाही, तुमचा काळ संपला, आता नागपूरला येऊन काय करणार? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या नागपुरात आयोजित बैठकी दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये आणि प्रदेश समन्वयक विश्वास पाठक उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे विदर्भात आले नाही, अधिवेशन घेतले नाही. त्यामुळे त्यांनी विदर्भात येण्यापेक्षा मुंबईतच काचेच्या केबिनमध्येच राहावे. मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे केवळ फेसबुकवर संवाद साधत होते. विदर्भाकडे दुर्लक्ष केले. राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यावर उद्धव ठाकरे आता नागपूरला येऊन उपयोग काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – “…म्हणून मी अध्यक्ष असेपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, अशी भावना व्यक्त केली” चंद्रशेखर बावनकुळेंनी केला खुलासा!

याचबरोबर, “महाविकास आघाडीला विदर्भात तोंड दाखवायला जागा नाही. त्यांनी नागपूरला हिवाळी अधिवेशन आयोजित केले नाही, विदर्भ वैधानिक विकास मंडळ स्थापन केले नाही, सत्तेवर असताना त्यांनी विदर्भाच्या विकासाबाबत बेईमानी केली. महाविकास आघाडीला विदर्भ आणि मराठवाडा माफ करणार नाही. उद्धव ठाकरे सत्तेवर असताना अडीच वर्षे विदर्भात का आला नाहीत? आता तुमचा काळ गेला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काळ आला आहे.” असंही बावनकुळेंनी म्हटलं.

अजित पवारांना काय म्हणाले?

याशिवाय, “अजित पवार आज सीमा प्रश्नावरुन भाजपावर आरोप करत आहेत, मात्र त्यांनी आतापर्यंत सीमा प्रश्नावर काय केले? महाविकास आघाडीचे नेते विकासावर बोलू शकत नाही, ते केवळ भावनिक आधारावर राजकारण करत आहे.” असा आरोपही यावेळी बावनकुळे यांनी केला.

“विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विदर्भाच्या विकासाविषयी बोलताना आधी आपण सत्तेवर असताना काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्याचे घोर विरोधी आहात. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही म्हणून भावनिक मुद्दे मांडून संभ्रम निर्माण करत आहे.” असं बावनकुळे म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 19:42 IST

संबंधित बातम्या