नागपूर: रानडुकराने धडक दिल्यानंतर दुचाकीला झालेल्या अपघातात मोहन गोविंदराव लक्षणे (२२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळी (काळबांडे) येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक मोहन गोविंदराव लक्षणे (वय २२, देवळी काळबांडे) हा एमएच ४०, सीव्ही ९८०९ क्रमाकांच्या हीरो स्प्लेंडरने खासगी कंपनीत कामावर जात असताना वलनी नाल्याजवळ रान डुकरांच्या कळपाने त्याला धडक दिली. त्यातच खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे उपनिरीक्षक शेख सलीम यांनी घटनास्थळी धाव घेत लक्षणेला अडेगाव प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले. तिथे डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
हेही वाचा – तिकीट वाटपातील घोळामुळे काँग्रेसचा पराभव! राजकीय वर्तुळात…
रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले
गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अतिवेग हे अपघाताचे प्रमुख कारण सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या सरस्वती विद्यालयाच्या सहल बसला अपघात होऊन त्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता तर त्याच दिवशी कामठीजवळ भरधाव कार पुलावर आदळून एकाचा मृत्यू झाला होता. याच दिवशी नागपूर ग्रामीणमध्ये पुलाखाली उभ्या रोडरोलवर प्रवासी घेऊन जाणार भरधाव ऑटो धडकून दोघांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी शहरातील सदर उड्डाण पुलावर एक बुलेट कारला धडकून चालक गंभीर जखमी झाला. शुक्रवारी वर्धा मार्गावर बर्ड पार्कजवळ एका दुचाकीला एसटीने धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या सर्व अपघातास वाहनांचा अतिवेग कारणीभूत ठरला आहे. रस्ते गुळगुळीत झाल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली असून अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.