चंद्रपूर : महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या कक्षात घुसून एका युवकाने स्वतःवरच चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी दोन वाजताच्या सुमाराला घडली. प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली. लक्ष्मण पवार असे या जखमी युवकाचे नाव आहे. तो लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वीच आयुक्त मोहिते यांना सुरक्षा रक्षक देण्यात आला. शहरातील समस्या घेऊन शिष्टमंडळ, नागरिक आयुक्तांच्या भेटीसाठी येतात. अशा भेटीत अनेकदा वादविवाद होतात. मात्र, आजपर्यंत असा प्रकार झाला नव्हता. दुपारी आपल्या कक्षात आयुक्त असताना पवारांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे त्यांच्या भेटीची वेळ मागितली. थोड्याच वेळानंतर पवार यांना आयुक्तांच्या कक्षात प्रवेश मिळाला. आत आयुक्त आणि पवार दोघेच होते. अचानक आयुक्तांनी भेदरलेल्या अवस्थेत सुरक्षा रक्षकाला मोठ्याने हाक मारली. सुरक्षा रक्षकाने त्वरित आत प्रवेश केला आणि समोरचे दृश्य बघून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. पवारांनी स्वतःवरच चाकूचा हल्ला केला.

हेही वाचा >>> गडचिरोली : प्रियकराच्या मदतीने मुलीनेच केली आईची हत्या

यात ते गंभीररित्या जखमी झाले. अगदी क्षणभरात झालेला प्रकार मनपातील कर्मचाऱ्यांना माहिती झाला. त्यांनीही आयुक्तांच्या कक्षाकडे धाव घेतली. दरम्यान, शहर पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. ते पोहचले आणि त्यांनी पवारला ताब्यात घेतले. त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. ते मनोरुग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून पवार मोहितेंच्या भेटीला कशासासाठी आले, आयुक्तांच्या कक्षात त्या दोघात नेमके काय झाले, या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासात समोर आल्यानंतरच स्वतःवरील चाकू हल्लाचे नेमके कारण समोर येईल. व्यक्तिगत वादातून हा प्रकार घडला आहे असे सांगण्यात येत आहे. आयुक्त मोहिते यांना विचारणा केली असता त्यांनी कामात व्यस्त आहे. नंतर सविस्तर माहिती देतो, असे सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth attacked himself with a knife in the office of chandrapur municipal commissioner rajesh mohite zws
First published on: 19-08-2022 at 18:58 IST