धावत धावत अंगावर ज्वलनशील पदार्थ घेत खामगाव उप विभागीय कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने पोलीस व महसूल यंत्रणांची एकच तारांबळ उडाली. मात्र, साध्या वेशातील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य अनर्थ टळला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमोल पाटील यांनी आज १ फेब्रुवारीला हे आंदोलन केले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमोल पाटील यांनी मागील २० जानेवारीला कृषी, महसूल, पोलीस विभागाला लेखी निवेदन दिले. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईमध्ये खामगाव तालुक्याचा समाविष्ट करण्यात यावा, सन २०२२ मध्ये शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी यासह इतर मागण्यांची दहा दिवसांत पूर्तता केली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला होता. प्रशासनाकडून याविषयी दखल न घेतल्यामुळे पाटील यांनी आज टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी एकट्यानेच हे आंदोलन केले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरही ते घोषणा देत होते. यामुळे उपविभागीय कार्यालय अक्षरशः हादरल्याचे दिसून आले.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना पाटील म्हणाले, की खामगाव तालुका अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्तांमध्ये समाविष्ट झाला नाही. याला शासन जबाबदार आहे.