एकमेकांच्या सुख-दु:खात साथ देणाऱ्या मित्राला युवकाने मोबाईलवर ‘मेसेज’ पाठवून शिवमंदिरात भेटायला बोलावले. मात्र, मित्राने ‘मेसेज’ उशिरा वाचला. त्यामुळे मित्राला पोहचण्यास वेळ लागला. मित्र वेळेवर न पोहचल्यामुळे युवकाने पिंपळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. देवेंद्र श्यामलाल परसमोडे (२३) रा. पटेल खदान झोपडपट्टी, वडधामना असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र परसमोडे आणि बस्तम नावाच्या युवकामध्ये जीवापाड मैत्री होती. देवेंद्र एका तरुणीच्या प्रेमात पडला. बस्तमने त्याला सहकार्य केले. तरुणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या देवेंद्रचे मित्र बस्तमकडे थोडेफार दुर्लक्ष झाले. तो बस्तमला वेळ देण्याऐवजी तो प्रेयसीला वेळ देऊ लागला. जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीने प्रेमात दगा देत दुसऱ्या युवकाशी ठाव धरला. त्याचे अतिव दु:ख देवेंद्रला झाले. प्रेमात दगा मिळाल्यामुळे तो नैराश्यात गेला. त्याला मित्र बस्तम आठवायला लागला. मात्र, तोपर्यंत बराच वेळ झाला होता. तो देवेंद्रकडून दुरावला आणि आपल्या वेगळ्या कामाला लागला. प्रेमात आलेल्या नैराश्यातून देवेंद्रने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, आपला मित्र बस्तमला भेटून एकदाचा निर्णय घेऊ, असे ठरविले. त्याने शनिवारी सकाळी ११ वाजता बस्तमला मोबाईलवर ‘मेसेज’ टाकला व शिवमंदिरात भेटायला बोलावले. त्यानंतर त्याने आत्महत्येचा निर्णय घेत अमरावती मार्गावर शिवमंदिर टेकडी येथे पिंपळाच्या झाडाला दोरी बांधून गळफास लावला. दुपारी २ वाजताच्या सुमारास परिसरातील लोकांना त्याचा मृतदेह दिसला आणि पोलिसांना सूचना देण्यात आली. वाडी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करून कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

‘….तर वाचला असता’

देवेंद्रने मित्र बस्तमला ११ वाजता ‘मेसेज’ केला होता. मात्र, बस्तम हा कामात असल्यामुळे त्याने दोन वाजता ‘मेसेज’ वाचला. त्याने ताबडतोब शिवमंदिर गाठले. मात्र, तोपर्यंत देवेंद्रचा मृत्यू झाला होता. जर मी वेळेवर ‘मेसेज’ वाचला असता तर मित्राचा हमखास जीव वाचला असता, असे बस्तमने पोलिसांना सांगितले.