वाशिम : पूर्वीच्या काळी १९ ते २२ व्या वर्षी मुला-मुलींची सर्रास लग्न व्हायची. परंतु आता मात्र लग्नाचे वय ३० ते ३८ च्या घरात जाऊन पोहचले आहे. लग्नासाठी मुली मिळत नसल्याने तरुणांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलींसाठी सरकारी नोकरी किंवा शहरात चांगल्या कंपनीत नोकरीवर असलेलाच जावई पाहिजे असल्याची मानसिकता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस लग्नाची समस्या जटील होत चालली असून, गावा-गावांत विवाह इच्छुक मुलांची संख्या वाढत आहे.

मागील काही दशकात ग्रामीण समाजव्यवस्था झपाट्याने बदलली. आधुनिकीकरण, तंत्रज्ञान आणि पाश्चिमात्य संस्कृती, सुख-सोई ह्या गोष्टींची महिती वाढली आहे. परिणामी लोकांच्या मानसिकतेतही बदल दिसू लागले. मुलगी जरी कमी शिकलेली असली तरीही मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारी नोकरी किंवा शहरात गलेलठ्ठ नोकरी असलेला जावई हवा असल्याची मानसिकता वाढली आहे.

हेही वाचा…“सिंगापूरच्या धर्तीवर चंद्रपुरात सफारी सुरू करणार”, वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांची घोषणा; म्हणाले…

झपाट्याने काळ बदलला आणि समाजात चौकसपणा वाढला, अनेकांच्या आयुष्यात सुख, सोई-सुविधा आल्या. शिक्षणाचे प्रमाण वाढले. मोबाईलच्या युगात सोशल मीडियामुळे बरेच बदल झाले. करिअरचा विचार करून उत्पन्नाचा प्रश्न आणि भविष्याचा विचार महत्वाचा वाटू लागला. या सर्व चक्रव्युहात विवाहयोग्य मुला-मुलींचे वय मात्र वाढत चालले आहे. तरुणाईचे रूपांतर प्रौढात होत असून विवाहाचे वय आणि शारीरिक अवस्था देखील निघून जात असल्याची विदारक स्थिती सर्वत्र दिसून येत आहे. समाजातील या गंभीर समस्येला नेमकं जबाबदार कोण? हाच खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

प्रत्येक गावात विवाह इच्छुक मुलांची संख्या वाढतेय!

ग्रामीण भागात सध्या विवाहाची समस्या वडीलधाऱ्या मंडळींसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मुलाचे विवाहाचे वय होऊनही कुणी मुलगी दाखवण्यास तयार नसल्यामुळे मुले सुद्धा निराशेच्या गर्तेत जात आहेत. परिणामी, प्रत्येक गावात किमान ४० ते ५० च्यावर विवाहयोग्य तरुण असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा…VIDEO : ताडोबा बफरचा अनभिषिक्त सम्राट ‘छोटा मटका’ पुन्हा एकदा मैदानात, व्हिडिओ एकदा पहाच…

माझ्याकडे दोन एकर शेती आहे. मी पदवीधर आहे. माझा रेतीचा व्यवसाय आहे. घर आहे. माझ्या व्यवसायातून मला वर्षाकाठी पाच ते सात लाख उत्पन्न होते. मात्र माझ्याकडे नोकरी नसल्याने लग्न जुळण्यास विलंब होत आहे. -गजानन देशमुख, तांदळी बु. ता. जि. वाशिम