नागपूर : एका तरुणाने एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १०.७३ लाख रुपये घेतले. मात्र, दुसऱ्याच तरुणीला जाळ्यात अडकवून लग्नासाठी निवड केली. लग्न तोंडावर असतानाच हा सर्व प्रकार प्रेयसीला माहिती पडला. तिने नंदनवन पोलीस ठाण्यात प्रेमात दगा देणाऱ्या प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या अंगाला हळद लागण्यापूर्वीच गुन्हा दाखल करून अटक केली. प्रसाद तेजराव कावळे (३२, विद्याननगर, पांधनरोड,नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे.

नागपुरात राहणारी पीडित ३१ वर्षीय तरुणी टीना (बदललेले नाव) ठाणे शहरात एका मोठ्या कंपनीत अभियंता आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तिची ओळख २०१२ मध्ये प्रसाद कावळे याच्याशी झाली. दोघांची मैत्री झाली आणि प्रेम फुलले. पदवी झाल्यानंतर टीना ही ठाण्यात नोकरीला लागली तर प्रसादने मोठमोठ्या हॉस्पिटलला ऑपरेशनचे साहित्य पुरविण्याचा व्यवसाय थाटला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीनाने प्रसादला पुण्यात बोलावले. तेथे महागडी सदनिका भाड्याने घेऊन ’लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागले. प्रसादने अनेकवेळा आर्थिक अडचणी किंवा व्यवसायात नुकसान झाल्याचे सांगून टिनाकडून पैसे घेतले. होणारा पती असल्यामुळे टीनानेही त्याला वेळोवेळी पैसे दिले. १० लाख ७३ हजार रुपये दिल्यानंतरही तो टीनाला पैसे मागत होता. तब्बल १० वर्षे पती-पत्नीप्रमाणे राहिल्यामुळे प्रसादने अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित करताना टीनाचे मोबाईलने अश्लील छायाचित्र काढले. तर काही चित्रफिती तयार करून मोबाईलमध्ये ठेवल्या. यादरम्यान, प्रसादने आणखी एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. टीनाचा पैसा त्या तरुणीवर उडवायला सुरुवात केली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नही ठरविले.

हेही वाचा – बुलढाणा : राजकीय पद देण्याचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; अमरावतीच्या महिलेने राजकीय लालसेत सर्वस्व गमावले

हेही वाचा – तलाठी भरती घोटाळा : निवड यादीत टॉपर असलेल्या दोन उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल

लग्न तोंडावर असतानाच टीनाला प्रियकराच्या लग्नाची पत्रिकाच हाती लागली. त्यामुळे लग्न करण्याचे आमिष दाखवून भलत्याच तरुणीशी लग्न करणाऱ्या प्रियकराला धडा शिकविण्यासाठी तिने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला हळद लागण्यापूर्वीच अटक केली.