नागपूर : चुलत भावाच्या वाढदिवसाला घरी गेलेल्या बहिणीवरच युवकाची नजर फिरली. त्याने नात्याचा विचार न करता चुलत बहिणीशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तीन महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या त्या युवकाविरुद्ध उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी टिना (काल्पनिक नाव) ही उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहते. ती अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिच्या घराशेजारीच तिचे चुलत काका राहतात. त्यांच्या घरी ती नेहमी ये-जा करीत होती. काकाचा मुलगा महेश्वर (२७) बी. कॉमच्या द्वितीय वर्षाली शिकतो. तो चुलत बहीण टिनाला दहावीपासून अभ्यासात मदत करीत होता. त्यामुळे ती नेहमी महेश्वरसोबत अभ्यास करीत होती. एकमेकांच्या सोबत राहत असताना महेश्वरचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जुळले. त्याने तिला अनेकदा प्रेमाची मागणी घातली. मात्र, तिने नात्याने चुलत भाऊ लागत असल्याचे सांगून वारंवार त्याला नकार दिला. मात्र, महेश्वरच्या नजरेतून टिना जात नव्हती. त्याने अनेकदा तिच्याशी अश्लील चाळे करीत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याकडे टिनाने दुर्लक्ष केल्याने तिच्या अंगलट आले. हेही वाचा - एकाही कंत्राटदाराला घरी बोलावले नाही, भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, काय म्हणाले गडकरी? फेब्रुवारी महिन्यात महेश्वरचा वाढदिवस होता. त्याने वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तिला रात्री अकरा वाजता घरी बोलावले. मध्यरात्रीनंतर कुटुंबियांनी केक कापून महेश्वरचा वाढदिवस साजरा केला. रात्र झाल्याने टिना तेथेच मुक्कामी होती. मध्यरात्रीनंतर महेश्वरने टिनाला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २ मे रोजी टिनाने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. त्यानंतर दोघीही मायलेकी डॉक्टरकडे गेल्या. डॉक्टरांनी तपासणी केली असता टिना तीन महिन्यांची गर्भवती होती. डॉक्टरांनी माहिती देताच टिनाच्या आईची भंबेरी उडाली. तिने चुलत भावाने शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगताच तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.