अनिल कांबळे
नागपूर : शहरातील हुक्का पार्लरची संख्या वाढत आहे. ‘फ्लेवर हुक्का’च्या नावावर तरुणाई मंद प्रकाशात पहाटेपर्यंत हुक्का पार्लरमध्ये धुंद झालेली दिसते. हुक्का पार्लरमध्ये तरुणाईला हेरून अंमली पदार्थाचाही पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहरात अनेक ठिकाणी नवनवे हुक्का पार्लर सुरू होत असून सायंकाळ होताच महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे पाय हुक्का पार्लरकडे वळत आहेत. आता तर शाळकरी मुलं-मुलीही तेथे गर्दी करीत असल्याची माहिती आहे. अनेक हुक्का पार्लरचे संचालक ‘हर्बल हुक्का’ या गोंडस नावाखाली रात्रभर पार्लर सुरू ठेवतात. शहरातील परिमंडळ एक आणि दोनमधील हुक्का पार्लरचे लोन आता शहरभर पसरत चालले आहे.
यापूर्वी परिमंडळ दोनच्या उपायुक्तांनी हुक्का पार्लरवर छापे टाकले होते. परंतु, हे पार्लर आता बिनधास्त सुरू असल्याची माहिती आहे. येथे पाचशे रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत हुक्का आहे. या हुक्क्यात सुपारी, पान रसना, चॉकलेट, अलादीन, मायामी, स्टोन वॉटर, आईसिमट या प्रकारच्या फ्लेवरची जास्त मागणी आहे.
पाण्याऐवजी बिअर
पूर्वी हुक्का पॉटमध्ये पाणी टाकण्यात येत होते. आता पाण्याऐवजी चक्क बिअर, व्हिस्की, व्होडका, तंबाखू आदींचा वापर केला जात आहे. एवढेच नव्हे तर, लवकर झिंग यावी यासाठी हुक्का पार्लरमध्ये आता दारूही उपलब्ध करून दिली जात आहे.
अंमली पदार्थाची जाहिरात
हुक्का पार्लरमध्ये येणाऱ्या तरुण-तरुणींना अंमली पदार्थाचे व्यसन जडावे, यासाठी काही ‘ड्रग्ज पॅडलर’ सक्रिय असतात. ते हुक्का पार्लरच्या मालकांशी मैत्री करून ‘ब्राऊन शुगर’, ‘हेरॉईन’, ‘एमडी’, ‘कोकेन’ या अंमली पदार्थाची जाहिरात करतात. या जाहिरातींना बळी पडून तरुण-तरुणी उत्सुकतेपोटी अंमली पदार्थाकडे आकर्षित होतात.
अंबाझरी-धरमपेठ केंद्रस्थान
हुक्का पार्लरचे मुख्य केंद्रस्थान म्हणून अंबाझरी-धरमपेठ परिसर ओळखला जातो. याचबरोबर आता गिट्टीखदान, सदर, सीताबर्डी, बजाजनगर, पाचपावली-इंदोरा चौक, जरीपटका, वाडी, सक्करदरा, हिंगणा, एमआयडीसी, प्रतापनगर आणि गणेशपेठ परिसरातही हुक्का पार्लर सुरू झाले आहेत. पोलीस ठाण्यातील कर्मचारी, गुन्हे शाखेचे युनिट आणि काही पोलीस अधिकाऱ्यांचे यात हात ओले असल्यामुळे हुक्का पार्लरवर कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.
शहरात हुक्का पार्लर अजिबात खपवून घेतले जाणार नाही. हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर कुणी लपूनछपून पार्लर सुरू ठेवत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. – चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.