वर्धा : नगर पालिका निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया निवडणूक कार्यालयाने सूरू केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १० तारखेपासून सुरवात झाली. पण आज चार दिवस लोटले. प्रतिसाद मात्र शून्य. अनेक पालिकेत एकही अर्ज आलेला नाही. निवडणूक अधिकारी पण चकित. कारण या दिवसात अर्जाची भरमार झाल्याचे यापूर्वीचे चित्र राहले. आता अर्जच नाही तर लढणार कोण, असे जर चित्र असेल तर जबाबदारी कोणाची, याचे पण उत्तर द्यावे लागणार. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आणि त्यामुळे लढण्यास ईच्छुक उमेदवारांचा उडालेला गोंधळ हे कारण पुढे आले आहे.
यावेळी अर्ज दाखल करण्याआधी इच्छुक व्यक्तीस प्रथम ऑनलाईन नोंदणी करायची आहे. त्यानंतर अर्ज दाखल होईल. अर्जातील माहिती ऑनलाईन सादर केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती सादर करावी लागणार. निवडणूक कर्मचारी ती तपासणार. तपासून त्यातील त्रुटी सांगणार. मग परत तो अर्ज सादर करावा लागणार. यात अपेक्षित मतदार यादीत नोंद, मालमत्ता विवरण, अपत्य संख्या व अन्य तपशील शपथ पत्रावर द्यावा लागणार. यातच गोंधळ उडत असल्याचे चित्र आहे. यात मार्गदर्शन करणारे कोणीच नाही. पक्षीय पातळीवर यंत्रणा आहे. पण एबी फार्म कोणाला मिळणार हे अनिश्चिचित असल्याने सगळीकडे धाकधूक दिसून येते.
निवडणूक अधिकारी दिनेश कथले हे म्हणतात की आमच्या पातळीवार काहीच समस्या नाही. संभाव्य उमेदवारांचे आम्ही याबाबत काल बुधवारी प्रशिक्षण घेतले. त्यात अर्ज दाखल करण्याबाबत मार्गदर्शन पण केले. तरी पण शंका असतील तर हेल्प डेस्क व अन्य चार टेबल ठेवले आहेत.शपथ पत्रावर अर्ज सादर केल्यानंतर त्यात काही त्रुटी असतील तर आम्ही त्याबाबत पत्र देणार.कागदपत्रातील त्रुटी सांगणार. १७ तारखेस दुपारी ३ पर्यंत त्या दूर करता येतील. रविवारी सुट्टी आहे. पण या दिवशी पण कार्यालय सूरू राहणार. म्हणजे मतदार यादी प्रमाणित प्रत, नो ड्युज प्रमाणपत्र दिल्या जाईल. अर्ज मात्र स्वीकारल्या जाणार नाही.
एकीकडे निवडणूक लढण्यास ईच्छुक उमेदवारांची चांगलीच चर्चा पण अर्ज दाखल करण्यास कोणीही धजावत नाही, असे आजच्या घडीचे चित्र. गोंधळ उडणार हे अपेक्षित धरून निवडणूक आयोगाने प्रशिक्षण पण घेतले. ऑनलाईन मार्गदर्शन पण झाले. तरी अर्ज नाहीच. राज्यभरातील ही स्थिती असल्याचे चित्र आहे. मार्गदर्शन करणारे नाही म्हणून काही ऑनलाईन केंद्राकडे जातात. पण ते सुद्धा केवळ नोंदणी करून देतात. अर्ज भरून देण्यास नकार देतात. कारण सगळा बाहुबली नेत्यांचा खेळ. चुकले आणि अर्ज रद्द झाला तर खैर नाही. याच संभ्रमात अर्ज विलंब होत असल्याचे ऐकू आले.
