गोंदिया : जिल्ह्यातील झाडीपट्टीच्या सांस्कृतिक वैभवाला आणि बोलीभाषेच्या समृद्ध परंपरेला राज्यस्तरावर मानाचा मुजरा मिळाला आहे. ‘लोककलावंतांचे गाव’ म्हणून परिचित असलेल्या म्हसवाणी (ता. सडक अर्जुनी) येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गझलकार आणि झाडीबोलीचे खंदे संवाहक लोकराम केशव शेंडे यांच्या ‘सरावन मईन्यात’ या कवितेचा समावेश महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या इयत्ता चौथीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. या निर्णयामुळे केवळ एका साहित्यिकाचा गौरव झालेला नसून झाडीबोलीचा मधुर शब्दगंध आता राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या ओठांवर फुलणार आहे.

ग्रामीण जीवनातील सहजता, निसर्गाशी असलेले घट्ट नाते, मातीतून उमटणाऱ्या भावना आणि झाडीबोलीची लयबद्ध अभिव्यक्ती यांचे सुंदर दर्शन घडविणारी ‘सरावन मईन्यात’ ही कविता विद्यार्थ्यांना भाषेची गोडी लावण्यासोबतच ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे, मराठी भाषेच्या मुख्य प्रवाहात झाडीबोलीतील साहित्याला मिळालेली ही एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद नोंद मानली जात आहे.

रंगभूमीपासून साहित्यविश्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

लोकराम शेंडे यांचा साहित्यिक आणि कलात्मक प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. अवघ्या पाचव्या वर्षी दंडार लोकनाट्यातून त्यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले. सातव्या वर्षी बालस्त्री कलाकार म्हणून रंगभूमीवर उभे राहत त्यांनी अभिनय आणि गायनाचा ठसा उमटविला. पुढे ‘एकच प्याला’, ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या गाजलेल्या संगीत नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारत रसिकांची वाहवा मिळविली.

लोककलेच्या अंगणात वाढलेल्या या कलावंताने पुढे साहित्याच्या वाटेवर पाऊल ठेवत झाडीबोलीला नवे सौंदर्य बहाल केले. झाडीबोलीत गझल लेखनाची परंपरा रुजविणारे पहिले गझलकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‘झाडीबोली रत्न’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. लोकराम शेंडे यांच्या साहित्यकृतींनी राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप उमटविली आहे.

साहित्यसंपदा आणि मानाचे सन्मान

कामगार म्हणून आयुष्याची वाटचाल करत असतानाच त्यांनी साहित्याची अखंड साधना केली. सलामी, लोकरामायण, फोंफोंड्रा (झाडी काव्यसंग्रह), माझी माय जामलाई यांसारख्या त्यांच्या साहित्यकृतींना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेत त्यांना २०२४ मध्ये वरोरा येथे झालेल्या ३२ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला. याशिवाय २०२६ चा राष्ट्रीय मराठी बोलीभाषा काव्यलेखन पुरस्कार तसेच अमरावती येथे आयोजित मराठी गझल संमेलनात निमंत्रित गझलकार म्हणूनही त्यांचा सन्मान झाला आहे.

झाडीबोलीचा सुवास आता घराघरांत

‘सरावन मईन्यात’ या कवितेचा बालभारतीत समावेश झाल्याने गोंदिया जिल्हा, झाडीपट्टी आणि बोलीभाषा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झाडीबोलीचा शब्दसुगंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असून स्थानिक भाषिक संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनाला नवी दिशा मिळणार आहे.

या यशाबद्दल भावना व्यक्त करताना लोकराम शेंडे म्हणाले, माझ्या गावातील मातीचा आणि झाडीबोलीचा सुवास या कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचणार आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. ही केवळ माझी नव्हे, तर संपूर्ण झाडीपट्टीच्या सांस्कृतिक अस्मितेची जिंक आहे. झाडीपट्टीच्या मातीतून उमललेला हा साहित्यरत्न आज बालभारतीच्या पानांवर झळकत असून, बोलीभाषेच्या वैभवाला नवी ओळख देणारा हा क्षण गोंदिया जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्णपान ठरत आहे.