वर्धा : फुलपाखरू… पंख आहेत म्हणुन पाखरू. फुलावर बसते म्हणुन फुलपाखरू. फडफडतं, भिरभीरतं आणि अलगद फुलावर विसावतं. एक कीटकच. पण नाव मोहक. साजूक नाव आणि देखणे रंग. एक क्षुद्र जीव पण नावामुळे मनावर मोहिनी घालतो. सर्वांना भुरळ घालणारा हा एक जीव पण म्हणतात कीटक. एक वेळ वाघ नं बघणारे भेटतील पण फुलपाखरू पाहले नाही, असे कोणी म्हणणार नाही. तर असा हा देखणा सजीव व त्याचा सखा पतंग यांची मोजदाद झाली आहे. हे एक ऐतिहासिक कार्य ठरले आहे. तब्बल एक तप म्हणजे १२ वर्ष याकामी खर्ची पडलेत.

झूऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया

केंद्रीय पातळीवर कार्यरत ZSI ( Zoological Survey of India ) म्हणजेच भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था. कोलकाता येथे मुख्यालय असलेली ही संस्था केंद्रीय पर्यावरण मंत्रालया अंतर्गत काम करते. भारतातील प्राण्यांच्या प्रजातीचा शोध घेणे, त्यांचा अभ्यास करीत नोंद ठेवणे. देशातील विविध प्राणी, पक्षी, कीटक, जलचर आदीचे वर्गीकरण करणे, नव्या प्रजातीची ओळख पटविणे, धोक्यातील प्रजातीच्या संवर्धनसाठी सरकारला मार्गदर्शन करणे, अशी जबाबदारी ही संस्था पार पाडते.या संस्थेने हे काम पूर्णतःवास नेले आहे. तब्बल १२ वर्ष अथक श्रम वेचत भारतातील फुलपाखरे व पतंग यांची सर्वसमावेशक यादी तयार करण्यात यश आले आहे. त्यास राष्ट्रीय यादी म्हणजे कॅटलॉग म्हटल्या जाते.

एका शतकातील नोंदी

यापूर्वी भारतातील फुलपाखरू व पतंग यांच्या नोंदी विस्कळीत स्वरूपात होत्या. गत एका शतकातील या नोंदी एकत्र करीत हा कॅटलॉग तयार करण्यात आला आहे. लेपिडोप्टरा या कीटक वर्गात मोडणाऱ्या या १३ हजार ७०३ या फुलपाखरू प्रजाती आहेत. या सर्वेक्षणातून एक महत्वाची बाब पुढे आली आहे. जगातील एकूण माहित असणाऱ्या फुलपाखरे व पतंगाच्या प्रजातीपैकी तब्बल ८. २५ टक्के प्रजाती भारतात आढळतात. परिणामी भारताचे अति जैवविविधता असलेले राष्ट्र म्हणुन स्थान अधिक बळकट झाले आहे.

प्रजाती वैविध्य असे

ही जैव विविधता हिमालयीन प्रदेश ते पश्चिम घाट आणि वि्षूववृत्तीय जंगलात पसरलेल्या परिसंस्थेत बघायला मिळते. भारतात सध्या या प्रजातीच्या ३ हजार ७०५ प्रजाती, २४० उपकुळे व अन्य कुळे आहेत. हा कॅटलॉग २२ खंडात आहे. ZSI चे संशोधक नवनीत सिंग व राहूल जोशी यांच्या नेतृत्वातील चमुने हा उपक्रम राबविला. आंतरराष्ट्रीय नियतकालिक Zootaxa यात याचा अंतिम खंड प्रकाशित झाला. या अंतिम खंडात उर्वरित १ हजार ६८९ प्रजातीची नोंद झाली. या यादीत जिओमेट्रोइडिया ( Geometroidea ) या रात्रीवेळी परागीकरण करणाऱ्या पतंगाच्या २ हजार २०५ प्रजातीची नोंद आहे.

कीड नियंत्रणसाठी उपयुक्त

शास्त्रज्ञाच्या मते फुलपाखरे व पतंग हे निसर्गात परागीकरणाची महत्वाची भूमिका पार पाडतात. ते पक्षी, वटवाघुळ व अन्य वन्यजीवांसाठी अन्नाचा एक स्रोत मानल्या जातात. कीड नियंत्रण व निसर्ग संवर्धणासाठी या नोंदी मूलभूत ठरतात. ही यादी जैव विविधता संशोधन, हवामान बदल अभ्यास यासाठी माहिती भंडार ठरणार. भारताच्या जैव विविधतेचा हा अमूल्य ठेवा जतन करण्याच्या दिशेने हा कॅटलॉग एक महत्वाचा टप्पा ठरल्याचे सांगितल्या जाते.

अभ्यासक म्हणतात

बोर अभयारण्याच्या अधिकारी व पतंग या कीटकवर शोधप्रबंध लिहत असलेल्या अर्चना नौकरकर या म्हणतात की ही सर्वसामावेशक सूची तयार होणे, एक स्वागतार्ह बाब आहे. त्यामुळे दुर्मिळ होत असलेल्या प्रजातीचे संरक्षण करण्याची काळजी घेतल्या जाईल. काही पतंग जिवंत राहण्यासाठी विशिष्ट वनस्पतीची गरज असते. त्या जपल्या जातील. पर्यावरण आरोग्य निर्देशांकात फुलपाखरू व पतंग महत्व राखून आहेत. ज्या परिसरात हे दोन्ही मोठ्या प्रमाणात आढळून येतात, तो परिसर पर्यावरणदृष्ट्या सुदृढ म्हटल्या जातो. बोर येथे या दोन्हीचे पूर्वीच सर्वेक्षण झालेले आहे.