नरभक्षक वाघिणीला दिसता क्षणी गोळ्या घालण्याच्या वनाधिकाऱ्यांच्या आदेशाला गुरुवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हिरवा कंदील दाखवला. या वाघिणीने केलेल्या हल्ल्यात गेल्या तीन महिन्यांत चार जणांचा जीव गेला आहे. तर इतर चार जण जखमी झाले आहेत.
मुख्य वनसंरक्षकांनी या नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्याच्या आदेशाला काही प्राणिमित्रांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तर दुसरीकडे वनविभागाकडून या वाघिणीला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या वाघिणीने गेल्या ७६ दिवसांत सुमारे ५०० किमीचा प्रवास केल्याचे वनअधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
१० जुलै रोजी काही स्थानिक लोकांवर या वाघिणीने हल्ला केल्यानंतर तिला दक्षिण ब्रह्मपुरीजवळ पकडण्यात आले होते. त्यानंतर तिच्या गळ्यात रेडियो कॉलर लावून बोर व्याघ्र प्रकल्पाजवळ सोडण्यात आले होते. २९ जुलैला या ठिकाणी सोडल्यानंतर या वाघिणीने सुमारे ५०० किमी प्रवास केला. दरम्यान, तीला रेडियो कॉलरच्या माध्यमांतून ट्रॅक केले जात आहे.
दरम्यान, या वाघिणीने केलेल्या हल्यात ४ लोकांचा मृत्यू झाल्याने वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी तिला पुन्हा पकडण्याची मोहिम हाती घेतली आहे. वनाधिकाऱ्यांच्या मते या वाघिणीला गोळ्या घालून ठार मारल्याशिवाय नियंत्रणात आणणे शक्य नाही. यामुळेच तिला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश मुख्यवनाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, या आदेशात काही तृटी आढळल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणी आदेश निर्गमित करण्यात आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 12, 2017 10:33 pm