तुम्ही नेहमी हिंदू धर्मातील सणांनाच विरोध का करता असा सवाल उपस्थित करत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्याला फटकारले आहे. तुम्ही याचिका मागे घ्या किंवा मग दंड भरा असा दमच हायकोर्टाने भरल्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली आहे.

लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्ष झाली आहेत. यानिमित्त राज्य सरकारने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. एका विशिष्ट धर्मासाठीच सरकारने स्पर्धा आयोजित केल्याचा दावा करत नागपूरच्या नागरी संरक्षण हक्क समितीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. बुधवारी या याचिकेवर सुनावणी झाली.  सरकार एका विशिष्ट धर्मासाठी स्पर्धा घेऊन पैसे खर्च करत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. यावर हायकोर्टाने सवाल उपस्थित केले.  सरकारने नागपूरमधील दीक्षाभूमी आणि मोठा ताजसाठीही खर्च केला आहे. तुम्ही नेहमी फक्त एकाच धर्माच्या सणाविरोधात याचिका का दाखल करता असा प्रश्नच हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारला.

नागरी हक्क संरक्षण समितीने यापूर्वी रावण दहनाला विरोध दर्शवत हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावेळीदेखील हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना २५ हजारांचा दंड ठोठावला होता. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्ष झाली आहेत. यानिमित्त राज्य सरकारने स्पर्धांचे आयोजन केले आहे. उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट मूर्तिकार अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यातल्या सजावटीच्या स्पर्धांमध्ये लाखो रुपयांचे पारितोषिकही  ठेवण्यात आले आहे. या स्पर्धांवर होणा-या उधळपट्टीवर याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता.