अंजनेरी-तळेगाव येथील घटनेचे जे पडसाद उमटले, त्यात एसटी महामंडळाचे सर्वाधिक नुकसान झाले. १८ बसची तोडफोड झाली तर सात बसगाडय़ा जाळण्यात आल्या. त्यात महामंडळाचे सुमारे दोन कोटीहून अधिकचे नुकसान झाले. या घटनाक्रमामुळे महामंडळाने बस वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महामंडळाच्या नुकसानीत आणखी भर पडली.

रविवारी सकाळपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने केली गेली. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. विल्होळी ते पाथर्डी फाटा परिसरात खासगी वाहनांसह सात बसेसची जाळपोळ होऊन त्या भस्मसात झाल्या.

एक बस आंदोलकांनीजाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी धाव घेतल्याने तिचे टायर जळण्याइतपत नुकसान झाले. या एकंदर स्थितीमुळे रविवार आणि सोमवारी दिवसभर महामंडळाने नाशिक-मुंबई, धुळे, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वर, जव्हार, शिर्डी या मार्गावरील बसची वाहतूक पूर्णपणे थांबविली.

जाळपोळीत महामंडळाला सर्वाधिक मोल मोजावे लागले. एका बसची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. सात बस बेचिराख झाल्या असतांना १८ बसगाडय़ांची तोडफोड करण्यात आली. त्यात अनेक बसच्या समोरील तसेच खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या. सीटचे कव्हर फाडण्यात आले. काही ठिकाणी आगीची धग बसून सीटचे नुकसान झाले. बसचा आतील भाग काळसर झाला. नुकसानग्रस्त गाडय़ांचे पंचनामे करण्याचे काम महामंडळाने हाती घेतले.

बसचे आणखी नुकसान होऊ नये म्हणून शहरातील आणि बाहेरील गावांची बस वाहतूक बंद केली गेली. सर्व बस महामार्ग, ठक्कर बाजार, मेळा आणि जुने मध्यवर्ती स्थानक या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या. वाहतूक बंद केल्यामुळे नाशिक-मुंबई मार्गावर दिवसभरात होणाऱ्या ४०-४५ फेऱ्या, त्र्यंबक-नाशिकच्या अंदाजे १०० फेऱ्या अशा विविध मार्गावरील फेऱ्या पूर्णपणे थंडावल्या. यामुळे दिवसाकाठी जमा होणारे ६५-७० लाखाच्या उत्पन्नाचे नुकसान झाले. शहर बस वाहतूक बंद असल्याने त्या उत्पन्नावर पाणी फेरले गेले. वाहनांच्या नुकसानीबरोबर एसटी महामंडळाला दैंनंदिन उत्पन्नावरही पाणी सोडावे लागले.

या शिवाय तिकिटाचे संच असलेले दोन ट्रे जळाले. सोमवारी ग्रामीण भागात काय स्थिती आहे याची माहिती घेतली गेली. परंतु, सायकाळपर्यंत बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही.

नुकसानग्रस्त बस नेण्यासाठी पोलीस संरक्षण

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या खाकी गणवेशधारींना दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात प्रचंड मनस्ताप सोसावा लागला. गोंदे फाटा परिसरात बस जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पिटाळले. त्यामुळे एक गाडी काही अंशी जळाली. या जळालेल्या गाडीचे टायर बदलून ती आगारात आणण्यासाठी काही कर्मचारी घटनास्थळी गेले असता त्यांना पुन्हा आंदोलनकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी संरक्षण देत आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला आणि ही बस मार्गस्थ केली.

एसटी बस चालक-वाहक कोंडीत

औरंगाबाद रस्त्यावरून येणाऱ्या एका बसवर दगडफेक झाली. बसचालकाने गाडी थांबवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दगडफेक करणारे चार-पाच मुले तिथेच उभे होते. चालकाने याच मुलांनी बसवर दगडफेक केली, त्यांना ताब्यात घ्या असे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तू बस काढ. आम्हाला शहाणपणा शिकवू नको असे सुनावले. म्हणजे एकीकडे आंदोलक आणि दुसरीकडे पोलीस अशा दोघांच्या कचाटय़ात चालक-वाहक सापडल्याचे पाहावयास मिळाले.

‘केवळ तिकीट ट्रे’साठी..

तिकीट विक्रीची संपूर्ण माहिती असलेल्या संचची जबाबदारी ही बस वाहकाची असते. विल्होळी फाटा येथे रविवारी आंदोलकांनी बस पेटविली. त्यात तिकिटांचा ट्रे बसमध्ये अडकला होता. तो काढण्यासाठी महिला वाहकाची तगमग सुरू होती. पोलिसांनी तिला रोखले. विभाग नियंत्रकांनी तिकीट ट्रेचे जाऊ दे, तू बाजूला हो असे सांगितल्यावर महिला वाहक माघारी फिरली.