शिक्षण विभागाकडून शिक्षकांना सूचना, दीड हजार शिक्षकांकडे जबाबदारी 

नाशिक : टाळेबंदीमुळे १० वी आणि १२ वी परीक्षेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असताना नाशिक विभागात इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्णत्वाकडे असून इयत्ता १० वीच्या उत्तरपत्रिका संबंधित शिक्षकांना तपासणीसाठी देण्यास सुरुवात झाली आहे. ३ मेपर्यंत उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

टाळेबंदीमुळे शिक्षण विभागाच्या कामकाजाला खीळ बसली आहे. १० वीच्या भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली. तर नववी आणि ११ वीची परीक्षा रद्द करण्यात आली. या प्रतिकूल परिस्थितीमुळे १० वी आणि १२ वीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु शिक्षण विभागाकडून बुधवारी नाशिक विभागात शाळानिहाय उत्तरपत्रिका तपासणीसाठी वितरित करण्यात आल्या. नाशिक विभागात प्रत्येक विषयासाठी एक हजार ५०० शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीची जबाबदारी पार पाडणार आहेत.

१२ वी उत्तरपत्रिका तपासणीचे काम ९२ टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी दिली. तसेच १०वीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शालेय स्तरावर देण्यात आल्या असून समाजमाध्यमातून पत्रकाद्वारे याची माहिती देण्यात आली आहे.

शाळेने आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्याकडून शिक्षकांसाठी परवानगी मिळवत शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी शाळेत येऊ द्यावे किंवा घरीच तपासू द्यावे.

पोलीस तसेच प्रशासनाला सामाजिक अंतर ठेवत काम केले जाईल, अशी ग्वाही द्यावी, असे शिक्षण विभागाने नमूद केले  आहे.

नाशिक विभागात १२ वी उत्तरपत्रिका तपासणीचे काम ९२ टक्केपूर्ण झाले आहे. दोन ते तीन दिवसांत इयत्ता १०वीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांच्या ताब्यात दिल्या जाणार असून ३ मेपर्यंत तपासणीचे काम पूर्ण होईल. 

– नितीन उपासनी (शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग)