शहरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावण्यास वेगवेगळ्या भागांतून गायब होणाऱ्या दुचाकींनी हातभार लावला. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी आता दुचाकी चोरटय़ांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याच अंतर्गत खडकाळी भागातील एका संशयिताकडून १० मोटरसायकली हस्तगत करण्याची कारवाई मुंबई नाका पोलिसांनी केली.
वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घडत आहेत. या माध्यमातून आजवर शेकडो दुचाकी चोरटय़ांनी लंपास केल्या आहेत. दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार वाढत असताना या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची सर्वसामान्यांची भावना होती. गेल्या काही महिन्यांत पोलीस विविध स्वरूपाची गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्या अंतर्गत गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, गुन्हेगारांना राजकीय पाठबळ देणारे घटक, टवाळखोर, नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालविणे, एटीएम सुरक्षा आदींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानंतर आता दुचाकी चोरींना प्रतिबंध घालण्याकडे यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंदा वाघ आणि स्थानिक गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक रमेश पवार व कर्मचाऱ्यांनी त्या अनुषंगाने संयुक्त मोहीम राबविली. मिळालेल्या माहितीच्या आधारे खडकाळी परिसरातून जाकीर अख्तर शेख (३२) याला अटक करण्यात आली.
संशयिताने शहरातील वेगवेगळ्या भागांतून दोन लाख रुपये किमतीच्या १० मोटारसायकली लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे. या मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या. संशयिताविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.