डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशन आणि हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम् या कलाम कुटुंबियांच्या संस्थांच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा वाढविण्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पलोड क्युब्स २०२१’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत देशातून एक हजार विद्यार्थी १०० लघूउपग्रह तयार करून अवकाशात सोडून त्यांचे कार्य कसे चालते याचे निरीक्षण करणार आहेत. याची जागतिक विक्रमात नोंद होणार आहे. या उपक्रमात राज्यातून ३५४ विद्यार्थी सहभागी झाले असून त्यात शहरातील १० अपंग विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

कलाम कुटुंबियांच्या संस्थांनी डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचा बौध्दिक विकास घडविण्यासाठी अनोखा असा उपक्रम हाती घेतला आहे. लघू उपग्रह तयार करण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना दोन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण मराठीतून देण्यात आले. या उपक्रमाची गिनीज बुकसह विक्र मांच्या विविध पुस्तकांमध्ये नोंद होणार आहे. शहरातील १० अपंग विद्यार्थी यात सहभागी होत असून त्यातील नऊ जण हे महाराष्ट्र समाज सेवा संचलित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयातील आहेत. यामध्ये काव्यांजली जंगले, समर्थ डाके, प्रसाद भोसले, सपना शेंगडे, आर्या थोरात, मल्हार ठाकरे, प्रतीक सूर्यवंशी, आर्यन देवतळे, स्वयंम मैंड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना विशेष शिक्षिका अर्चना कोठावदे, वर्षां काळे आदी शिक्षकांसह शाळेचे मुख्याध्यापक संतोष पाटील मार्गदर्शन करीत आहेत.

या उपक्रमास संस्थेच्या पदाधिकाऱ्ऱ्यांचे पाठबळ लाभत आहे. या उपक्रमाचे नेतृत्व जिल्ह्यातून दीपक पगार, बाळासाहेब सोनवणे हे करीत आहेत. १० मुलांच्या गटात एक लघू उपग्रह तयार होईल.

राज्यातील विद्यार्थी जवळपास ३० लघू उपग्रह तयार करणार आहेत. यात माई लेले श्रवण विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक लघू उपग्रह असेल. राज्यातील विद्यार्थ्यांचे उपग्रह तयार झाल्यानंतर ते ते रामेश्वरम येथे नेले जातील. सात फेब्रुवारी रोजी देशातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले लघूउपग्रह रामेश्वरम् येथून अवकाशात सोडले जाणार आहेत.

कसा असेल हा लघू उपग्रह ?

जगातील हा सर्वात कमी वजनाचा उपग्रह असेल. त्याचे वजन साधारणत: २५ ते ८० ग्रॅम असेल. असे १०० उपग्रह एकाचवेळी रामेश्वरम्मधून हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित करून ते ३५ हजार ते ३८ हजार मिटर उंच अवकाशात स्थिर करण्यात येतील. वातावरणातील बदल, सूर्याची अतिनील किरणे, अवकाळात होणारे बदल ओझोनच्या थराचा अभ्यास आदी विषयांवर विद्यार्थी अभ्यास करतील.