19 January 2019

News Flash

सेझची जमीन उद्योगासाठी

सिन्नर तालुक्यातील सेझबाबतच्या २५०० एकर जमिनीचा प्रश्न सुटेल.

सिन्नर येथील उद्योग भवनात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना उद्योगमंत्री सुभाष देसाई. समवेत आ. राजाभाऊ  वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील आदी.

राज्यात १० हजार हेक्टर जमीन उपलब्ध होणार

सेझसाठी निश्चित केलेल्या, परंतु कार्यवाही न झालेल्या ठिकाणी ‘एकात्मिक उद्योग क्षेत्र’ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून यामुळे राज्यातील विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझची १० हजार हेक्टर जमीन उद्योग विकासासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीतील उद्योग भवनात आयोजित बैठकीत देसाई यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनामार्फत एकात्मिक उद्योग क्षेत्राविषयी नियमावली तयार करण्यात येत असून त्याचा लाभ औद्योगिक क्षेत्रासाठी होईल. क्षेत्र बदलाबाबतच्या धोरणात शासनस्तरावर सुधारणा करण्यात येईल. औद्योगिक क्षेत्रातील कराबाबत ग्रामविकास विभागाशी चर्चा करण्यात आली असून या क्षेत्रातील करवसुली उद्योग विभागातर्फे करण्यात येईल आणि त्याचा निम्मा हिस्सा ग्रामपंचायतीला देण्यात येईल. तसेच उर्वरित रक्कम औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांसाठी वापरली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सिन्नर तालुक्यातील सेझबाबतच्या २५०० एकर जमिनीचा प्रश्न सुटेल. त्याची विकासास मदत होईल. मुसळगाव येथे औद्योगिक क्षेत्रात सहकाराच्या आधारे यशस्वी संस्था सुरू असल्याबद्दल देसाई यांनी समाधान व्यक्त केले. सहकारी उद्योग वसाहतीतील विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल. यासाठी इतर शासकीय विभागांशीही चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. उद्योगमंत्र्यांनी उपस्थितांकडून औद्योगिक क्षेत्राच्या समस्या जाणून घेतल्या. औद्योगिक वसाहतीतील प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग विभाग तातडीने निर्णय घेईल, असे आश्वासन दिले.

मुसळगाव सहकारी उद्योग वसाहतीत शासनाच्या वतीने दोन कोटी ७० लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्ते पायाभूत प्रकल्पाचे भूमिपूजन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, अधीक्षक अभियंता नितीन वानखेडे, रामदास दराडे, कमलाकर पोटे, नामकर्ण आवारे आदी उपस्थित होते.

‘सहकार क्षेत्राची विश्वासार्हता जपणे महत्त्वाचे’

जनतेचा विश्वास संपादन केल्यास सहकार क्षेत्राच्या विकासाबरोबर ग्रामीण विकासाला चालना मिळणार असल्याने सहकार क्षेत्राची विश्वासार्हता जपणे महत्त्वाचे असल्याचे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. सिन्नर येथील कुंदेवाडी गावात श्री जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सहकार क्षेत्राशी अनेक नागरिकांचा विश्वास जोडला गेला आहे. नागरिकांचा आर्थिक विकासही या क्षेत्रावर अवलंबून आहे. सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली. त्यामुळे या क्षेत्राला पुढे नेणे आणि उत्तम व्यवहाराच्या माध्यमातून जनतेचा विश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

 

First Published on April 11, 2018 3:19 am

Web Title: 10 thousand hectare land for sez will be available for industry development