15 July 2020

News Flash

नाशिक जिल्ह्यात १०७३ रुग्ण

शहरातील एका आमदारासह त्यांच्या कुटूंबातील तीन सदस्यही बाधित

संग्रहित छायाचित्र

टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात बंधने काहीशी सैल केल्यानंतर शहरातील रहदारी मोठय़ा प्रमाणावर वाढली असून शारीरिक अंतरपथ्य पाळले जात नसल्याने करोना संसर्गात भरच पडत आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १०७३ पर्यंत पोहचली आहे. शहरातील एका आमदारासह त्यांच्या कुटूंबातील तीन सदस्यही बाधित झाल्याने इतर लोकप्रतिनिधीही सतर्क झाले आहेत.

टाळेबंदी सैल झाल्याने शहरातील दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले. याचा अप्रत्यक्ष परिणाम करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढण्यावर होत आहे. शहरातील एक महिला आमदार काही दिवसांपूर्वी मुंबई येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेल्या होत्या. त्यांचे १२ दिवस तिथे वास्तव्य होते.

नाशिकमध्ये परतल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय सल्ल्याने त्यांनी स्वतला तसेच कुटूंबातील सदस्यांचे विलगीकरण केले होते. गुरूवारी त्यांच्यासह कुटुंबातील तीन सदस्यांचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे आमदार राहत असलेली निवासी इमारत प्रतिबंधित करण्यात आली आहे.

महापालिका हद्दीत शुक्रवारी आठ रुग्ण आढळले. लेखानगर येथील ६२ वर्षांचा पुरूष, कमोद गल्लीतील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत ७० वर्षांची व्यक्ती, क्रांती नगराती रुग्णाच्या संपर्कात आलेली गणेशवाडीतील ३४ वर्षांची व्यक्ती, मुंबईहून कंपनीच्या कामासाठी सिताराम कॉलनीत आलेला ३१ वर्षांचा तरूण, महालक्ष्मी थिएटरमागील रुग्णाच्या कुटूंबातील १६ वर्षांची युवती, करोनाग्रस्त नातेवाईकाच्या संपकार्त आलेला सिन्नर फाटा येथील २६ वर्षांचा युवक, नाशिक येथील ग्रामीण पोलीस दलातील ४३ वर्षांचा आणि २९ वर्षांचा पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

शुक्रवारी सायंकाळपर्यंत महापालिका हद्दीत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १६२ वर पोहचली आहे. ५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून शहर परिसरात आतापर्यंत आठ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

काही दिवसांपासून ग्रामीण भागातही रुग्ण संख्येत भरच पडत आहे. सद्यस्थितीत नाशिक ग्रामीण मध्ये १६१ करोनाग्रस्त रुग्ण आहेत. शुक्रवारी नांदगावचे तीन रूग्ण बाधित आढळून आले. मालेगावमध्ये ही संख्या ७२२ पर्यंत पोहचली आहे. जिल्हाबाहेरील ४९ रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा हा १०७३ वर पोहचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 3:06 am

Web Title: 1073 patients in nashik district abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 रस्त्यांच्या कामांसाठी कर्जरोखे
2 Coronavirus : शहरात करोनाचा वाढता प्रसार
3 मालेगावमध्ये दोन दिवसांत करोनाचे नवीन ३२ रुग्ण
Just Now!
X