११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

नाशिक : जिल्ह्य़ातून तीन दिवसांत १९ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी इयत्ता ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा दुसरा भाग भरला आहे.

करोना संकटामुळे यंदा १० वीचा निकाल उशिरा लागला. त्यामुळे ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेलाही उशीर झाला. संपूर्ण प्रवेश प्रक्रि या पूर्ण होऊन नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार, अभ्यासक्रम पूर्ण होईल काय, याची पालक-विद्यार्थ्यांना चिंता भेडसावत आहे. ११ वी प्रवेशासाठी जिल्ह्य़ातून ३० हजार ५७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २४ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया अर्जाचा पहिला भाग भरला. त्यातील २४ हजार ६९२ अर्जाची छाननी झाली. दुसरा भाग १९ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी भरला.

२५ ऑगस्ट रोजी दुपारी चापर्यंत अर्जाची छाननी करणे, संवर्गनिहाय प्राप्त अर्जानुसार विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात येईल. २६ रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर दोन दिवस यादीनिहाय प्रवेश प्रक्रिया पार पडेल. २८ रोजी रिक्त जागी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर होईल. ३१ पर्यंत दुसऱ्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पार पडेल. ३१ रोजी दुपारी चारनंतर प्रतीक्षा यादी जाहीर होईल. १ सप्टेंबरला दुपारी चापर्यंत प्रवेश प्रक्रिया पार पडेल. यानंतर रिक्त जागी चौथ्या प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे तसेच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही शिल्लक राहिलेल्या जागा प्राप्त प्रवेश अर्जानुसार गुणानुक्रमे भरण्यात येतील.

शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडे २ सप्टेंबर रोजी प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची यादी आणि संवर्गनिहाय यादी देण्यात येणार आहे.

यंदा विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखेकडे, याविषयी तर्कवितर्क लढविले जात असताना विज्ञान शाखेपेक्षा यंदा वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक दिसून येत आहे. विज्ञान शाखेसाठी खासगी शिकवणी वर्गासाठी लागणारे अवास्तव शुल्क, अभियांत्रिकीसह अन्य क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे वाणिज्य शाखेतच करिअर करण्याची इच्छा विद्यार्थी व्यक्त करत आहेत.