शहराच्या मध्यवर्ती भागातील किशोर सुधारालयातून सोमवारी पहाटेच्या सुमारास गंभीर गुन्ह्यातील १२ संशयितांनी पलायन केल्यामुळे सुधारगृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेसे हे पलायन नाटय़ घडले. हा सर्व प्रकार घडेपर्यंत सुरक्षारक्षकांना थांगपत्ताही लागला नाही. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लगेचच शोध मोहीम राबविल्याने दुपापर्यंत दोन जणांना पकडण्यात यश आले.
वेगवेगळ्या गुन्ह्यात पकडल्या गेलेल्या अल्पवयीन म्हणजे १८ वर्षांखालील गुन्हेगारांना न्यायालयीन निर्देशानुसार किशोर सुधारालयात ठेवले जाते. गंभीर गुन्ह्यातील संशयितांचा त्यात समावेश आहे. मेळा व ठक्कर बजार एसटी बसस्थानकांसमोर हे सुधारालय आहे. त्याच्या आसपास पोलीस अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने असून बस स्थानकांमुळे परिसरात नेहमी वर्दळ असते. बाल सुधारालयात विविध जिल्ह्यातील एकूण २२ संशयितांना ठेवण्यात आले होते. मध्यरात्री भोजन झाल्यावर नेहमीप्रमाणे हे सर्व जण बराकीत झोपण्यासाठी गेले. त्यातील काहींनी पळून जाण्यासाठी आधीच नियोजनपूर्वक तयारी केल्याचे उघड झाले आहे.
बराकीत नेलेल्या लोखंडी ब्लेडच्या साहाय्याने लोखंडी गज कापले, आतील एक दरवाजा त्यांनी चावीच्या साहाय्याने उघडला. त्यानंतर १५ ते २० फूट उंचीची भिंत ओलांडण्यासाठी वेगवेगळ्या कापडाच्या साहाय्याने तयार केलेल्या दोरीचा वापर केल्याचे निदर्शनास आले. दोन्ही बराकीत एकूण २२ संशयित होते. पण, त्यातील १२ जण पळून गेली. उर्वरित संशयित बालके पळाली नाहीत.
ही बाब पहाटे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यावर तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.पोलीस उपायुक्त एन. अंबिका, साहाय्यक पोलीस आयुक्त राजू भुजबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या घटनाक्रमातील उपरोक्त बाबी नमूद केल्या. तत्पूर्वीच संशयितांचा शोध घेण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. सुधारगृहाच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी दोन अधिकारी व काही कर्मचारी नियुक्त आहेत. ही सुरक्षाव्यवस्था भेदण्यात संशयित कसे यशस्वी ठरले, याची छाननी तपास यंत्रणा करत आहे.
पळालेल्या संशयितांमध्ये नऊ पुणे जिल्ह्यातील तर तीन सातारा तर एक मुंबई येथील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पळालेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके लगेच कार्यप्रवण झाली. त्यातील दोघांना पकडण्यात आले आहे.