करोना’ संकटाला यंत्रणा तोंड देत असतांनाच बदलत्या वातावरणामुळे आता नाशिक जिल्ह्य़ात ‘स्वाईन फ्लू’ ने डोके वर काढले आहे. उत्तर महाराष्ट्रातही कमी अधिक फरकाने अशीच स्थिती आहे. करोनाचा अद्याप उत्तर महाराष्ट्रात एकही रूग्ण आढळून आलेला नाही.

दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पडलेल्या पावसामुळे सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच काही रूग्णांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे आढळली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून दोन जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

दुसरीकडे, जिल्हा परिसरात करोनाच्या संशयावरून आतापर्यंत विदेशातून आलेल्या ५१७ नागरिकांची तपासणी झाली आहे. यातील ४०९ रुग्णांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आलेअसून ६० जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. पाच जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. नाशिक विभागात आतापर्यंत एक हजार ४२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३२५ रुग्णांमध्ये करोनाची काही प्राथमिक लक्षणे आढळली. ३०० लोकांचे अहवाल नकारात्मक, तर १० जणांचे अहवाल हे पुरेसा नमुना घेतला न गेल्याने पुन्हा पाठविण्यात आले. नगर येथे तीन रुग्ण करोनाग्रस्त आहेत. त्यांच्यावर १२ दिवसांपासून विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लूसदृश्य रुग्णही आढळत असून त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे नाशिक विभाग आरोग्य संचालकांनी नमूद केले.

* धुळे परिसरात मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी होणारी नमाज मशिदीऐवजी घरीच अदा केली. जिल्ह्य़ातील मशिदी यावेळी बंद ठेवण्यात आल्या होत्या.