गुढी पाडव्यापासून सुरू होणाऱ्या नववर्ष स्वागतासाठी भगव्या रंगाचा ध्वज हाती घेत ढोल ताशांच्या गजरात निघणारी स्वागतयात्रा, थिरकणारी पावले, पारंपरिक वेशभूषा परिधान करत सहभागी होणारे बाल गोपाळ हे चित्र शहरवासीयांना नवीन नाही. यंदा नववर्षांत हे चित्र पुन्हा दिसणार असले तरी त्यात प्रथमच रंग भरले गेले आहेत ते संस्कृती संवर्धन न्यासच्या वतीने निर्मिलेल्या १२५ बाय १२५ फूट आकारातील महारांगोळीचे.

येथील यशवंतराव महाराज पटांगणावर संस्कृती न्यासच्यावतीने नववर्ष स्वागतासाठी डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे औचित्य साधत कलावंताच्या सहकार्याने महारांगोळीत त्यांचे चित्र काढत अभिवादन करण्यात आले. महारांगोळीची सुरुवात वेणाभारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी सहा वाजता झाली. यावेळी उपस्थितांनी हिंदू-संस्कृतीतील रांगोळीचे मंगल प्रतीक लक्षात घेत सर्वाचे आयुष्य रांगोळी प्रमाणे विविध रंगानी बहरलेले व मंगलमयी व्हावे अशी प्रार्थना केली. रांगोळीकार शंकर टिळे व नीलेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने कामास सुरुवात झाली. सामाजिकतेचे भान जपत रांगोळीतून ‘पाणी वाचवा, बेटी बचाओ’ हा संदेश देण्यात आल्याची माहिती नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष राजेश नाशिककर यांनी दिली.

डॉ. आंबेडकर व हेडगेवार हे राष्ट्रभक्ती, देशोन्नती व सामाजिक प्रगती या समविचारांचे प्रतीक आहेत. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. रांगोळी आकारास येण्यासाठी

१५० महिला कलावंतानी सहभाग घेत २०० टन रांगोळीचा वापर करण्यात आला. यासाठी महिलांचे गट करत टप्पाटप्प्यात ही रांगोळी पूर्णत्वाकडे नेण्यात आल्याचे उपक्रमाच्या प्रमुख सुचेता भानोसे यांनी सांगितले.

रांगोळी उपक्रमात सहभागी महिलांचा सत्कार करण्यात आला. ही रांगोळी नाशिककरांसाठी गुरुवापर्यंत खुली राहणार आहे.