नगरसेवक निधीतून खरेदीची तयारी

नाशिक : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात प्राणवायूयुक्त खाटांअभावी उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेने नगरसेवक निधीतून हवेतील प्राणवायू रुग्णास देणारी तब्बल १२५० यंत्रे अर्थात ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रे्टर’ खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. रुग्णालयातील खाटांवर प्राणवायुयुक्त यंत्रणा कार्यान्वित करणे खर्चिक असते. ती तातडीने उभारणे अवघड असते. या परिस्थितीत या यंत्रणेमार्फत सर्वसाधारण खाटेवर रुग्णांना प्राणवायू देण्याची व्यवस्था करता येते. या यंत्रणेसाठी नगरसेवकांसह स्थानिक लोकप्रतिनिधी निधी देण्यास पुढे येत आहेत

वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून व्हेंटिलेटर, प्राणवायुयुक्त खाटा मिळवण्यासाटी नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. महापालिकेसह खासगी रुग्णालयात प्राणवायूच्या खाटा शिल्लक नाही. गंभीर रुग्णांना वेळेवर प्राणवायू न मिळाल्यास त्यांच्या जिवावर बेतू शकते. पुढील काळात रुग्णालयांना प्राणवायुचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. यावर हवेतील प्राणवायू रुग्णांना पुरविणारी यंत्रणा महत्वाची ठरू शकते. महापालिकेकडे आधीचे १०० आणि नव्याने खरेदी केलेली १०० याप्रमाणे एकूण २०० ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रे्टर’ असतील. परंतु, करोनाचा कहर पाहता ती कमी पडण्याचा संभव आहे. मध्यंतरी पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरसेवक निधीतून आणखी यंत्र खरेदी करण्यावर विचारविनिमय झाला. प्रत्येक नगरसेवकाच्या निधीतून प्रत्येकी १० याप्रमाणे १२५ नगरसेवकांच्या निधीतून १२५० ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ उपलब्ध करता येतील. त्या अनुषंगाने तयारी करण्याची सूचना जाधव यांनी केली होती. सर्वसाधारणपणे ३० हजार रुपये किंमतीचे हे यंत्र आहे. सर्वसाधारण खाटेवर ते सहजपणे कार्यान्वित करता येते. १२५० ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रे्टर’ खरेदी करण्यासाठी सुमारे ३५ ते ४० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या उपकरणाची मागणी तातडीने नोंदवून पुढील काही दिवसांत ती उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टिकर यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी बालगणेश फाऊंडेशनतर्फे रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी हे यंत्र उपलब्ध करण्याची तयारी केली आहे. पालिकेतील इतर नगरसेवकही तसाच उपक्रम राबविण्याच्या तयारीत आहेत.

मदतीसाठी आमदारांचाही पुढाकार

करोनामुळे ओढावलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे सरसावले आहेत. नाशिक पश्चिमच्या सीमा हिरे यांनी आमदार निधीतून १५० ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रे्टर’ यंत्र खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी यंत्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी १५ लाखाचा निधी उपलब्ध केला आहे. या संदर्भातील पत्र हिरे आणि फरांदे यांनी जिल्हा नियोजन समितीला दिली. प्राणवायुयुक्त खाट वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांची फरफट होत आहे. रुग्णांना रुग्णालयात खाट उपलब्ध होत नसल्याने काही रुग्णांना घरीच प्राणवायुची सुविधा देण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो. रुग्णांना घरी जागा उपलब्ध असल्यास प्राणवायू यंत्र उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचा जीव वाचविण्यास मदत होईल, याकडे उभयतांनी लक्ष वेधले.