गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कोसळणाऱ्या संततधारेमुळे गंगापूर धरणातील जलसाठा कमालीचा वाढत असल्याने धरणातून गोदापात्रातील विसर्ग सातत्याने सुरू आहे. आज सकाळी ८ वाजेपासून गंगापूर धरणातून १० हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात आला. यांनतर दुपारी २ वाजता १२ हजार ५२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्यामुळे गोदावरी नदी धोक्याची पातळी गाठण्याच्या मार्गावर आहे. गोदावरी नदी परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गंगापूर धरणातून सोडण्यात आलेले पाणी शहरातील होळकर पूलाखाली पोहचल्याने येथून पुढे ९ हजार ४७० क्यूसेक पाणी सकाळी गोदापात्रात प्रवाहित करण्यात आले. यांनतर यात ११ हजार २१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदी पात्रातील दुतोंड्या मारूतीच्या खांद्यापर्यंत पाण्याची पातळी पोहचल्याने दुसरीकडे हा पूर पाहण्यासाठी अहिल्याबाई होळकर पुलावर नागरिक गर्दी करत आहेत.
जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात संततधारेमुळे शनिवारी (दि.२२) दुपारपासून रात्रीपर्यंत सलग एक हजार ते पंधराशे क्युसेक पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. गोदावरी नदी पात्राजवळील गोवर्धन, गंगापूर गाव, टाकळी आणि दसक परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. अग्निशामक दलातील जवान तसेच पोलीस प्रशासनकाकडून गोदावरी नदी काठालगत गस्त घातली जात आहे.

रविवारची सुटी असल्यामुळे गोदावरी नदी पात्रातील सोमेश्वर धबधबा, बालाजी मंदिर, नवश्या गणपती, रामकुंड, गोदाघाट आणि तपोवन परिसरात पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. नदी पात्रातील सर्व छोटे पुल पाण्याखाली गेले आहेत. नदी पात्रातील अहिल्याबाई होळकर पूलासह संत गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर पूल, लक्ष्मीनारायण पूल या परिसरात पूर पाहणाऱ्या नागरिकांची गर्दी होत आहे. पूर पाहण्यासाठी येणारे नागरिक रस्त्यावरच आपली वाहने उभी करत असल्याने या ठिकाणाहून पायी जाणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
दुसरीकडे पूर पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांकडून नदीपात्रापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न शर्थीने केले जात आहेत. पूल परिसरात सेल्फी काढणाऱ्या नागरिकांना मज्जाव केला जात असून नदी पात्रातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने कोणीही धोका पत्करू नये असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ६१ हजार १३८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग

आज (दि.२३ जुलै) नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सकाळी आठ नंतर ४९ हजार १९२ क्यूसेक पाणी सोडण्यात आले. यांनतर दुपारी दोन वाजता ६१ हजार १३८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे हे पाणी पुढे औरंगाबादमधील जायकवाडी धरणाला जाऊन मिळणार असून आतापर्यंत १२ टीएमसी पाणी या धरणातून सोडण्यात आले आहे. तसेच दुपारी दोन वाजता जिल्ह्यातील दारणा धरणातून १६ हजार ८७५ क्यूसेक, कडवा ८ हजार ८५६ क्यूसेक, वालदेवी धरणातून १ हजार ५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या होत आहे.
[jwplayer dy7r2d6R]