१५ जून रोजी सर्व शाळांमध्ये प्रदीर्घ सुटीनंतर शाळेची पहिली घंटा वाजणार असताना आजही जिल्ह्यात हजारो बालक पोटाची खळगी भरण्यासाठी काम करत असल्याने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. या बालमजुरांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेत त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालय प्रयत्न करत आहे. त्या अंतर्गत मालेगाव येथे विशेष वर्गाच्या माध्यमातून १२५४ बालक शिक्षण घेत असून येत्या शैक्षणिक वर्षांत त्यातील काही जण नियमित विद्यार्थी होऊन विविध इयत्तांमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत.
राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्याच्या माध्यमातून शिक्षणाची दारे दिव्यांगासह समाजातील वंचित दुर्बल घटकांना खुली केली. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साद घातली गेली. मात्र आजही हजारो बालके ही आर्थिक विवंचना आणि भ्रामक समजुती यामुळे शिक्षणापासून दूर आहेत. नाशिक जिल्ह्य़ाचा विचार केल्यास औद्योगिक कामगार आयुक्तांकडून झालेल्या सर्वेक्षणात ९ ते १४ वयोगटातील १२५४ बालके शाळाबाह्य़ सापडली असून ती बालमजूर आहेत. मालेगाव शहरात हे प्रमाण सर्वाधिक असून महापालिका तसेच जिल्हा परिषद हद्दीत हे प्रमाण तुलनेत कमी आहे. कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी ही बालके मालेगावमधील हातमाग व्यवसायात ओढली गेली. त्यात मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. शाळा गळती मागे आर्थिक विवंचना हे महत्वाचे कारण असले तरी मुलींना असुरक्षिततेच्या धास्तीमुळे पालक शाळेत पाठवत नाही. तसेच काही अंधश्रद्धांचाही पालकांवर पगडा आहे. दुसरीकडे मुलांवरही कर्ता पुरुष म्हणून नकळत जबाबदारी पडल्याने त्यांचे शिक्षणावरील लक्ष उडाले. या परिस्थितीत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे बाल मजुरीविरोधात काम करणाऱ्यांसमोर आव्हान ठरते. कामगार आयुक्त कार्यालयाने विशेष प्रकल्पाची आखणी करत ज्या ज्या ठिकाणी ५० हून अधिक बालमजूर आढळले, त्या परिसरात आठवडय़ाची शाळा किंवा दररोज वर्ग ही संकल्पना राबविण्याचे ठरवले. त्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमाची चौकट मोडत अनौपचारिक वर्ग भरवण्यात येत आहे. जिल्ह्य़ात इतर ठिकाणी बालमजूर असले तरी संख्या ५० च्या आत असल्याने तेथे वर्ग भरवता येत नसल्याची खंत प्रकल्प अधिकारी जयप्रकाश देशमुख यांनी व्यक्त केली. मालेगावमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असल्याने तेथे नियमितपणे हे वर्ग भरवले जात आहे. बालमजुरांची मानसिकता, बौद्धिक क्षमता आणि वय यांचा विचार करून त्यांच्यासाठी केवळ अक्षरओळख आणि अंकओळख, गणिती संकल्पना यासह काही महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करत अभ्यासक्रम तयार केला आहे. प्राथमिक तयारी पूर्ण झाल्यानंतर त्यांना जवळपासच्या महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. त्याचा पाठपुरावाही केला जातो. गेल्या काही वर्षांत या माध्यमातून ४० बालमजूर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. यंदाच्या वर्षांत १५-२० विद्यार्थी नियमीत शाळेत जातील असे देशमुख यांनी सांगितले. या मुलांमध्ये त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही कौशल्ये विकसीत व्हावी यासाठी ‘व्होकेशनल’ वर्ग भरवला जातो. भविष्यात नव्या काही प्रकल्पांची आखणी केली जात असून त्याच्या यशस्वीतेसाठी पालक आणि बालमजूर असणाऱ्या बालकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.