एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जळगाव महापालिकेतील १३ भाजप नगरसेवकांनी रविवारी राजीनामा दिला. जळगाव महापालिकेत भाजपचे १५ नगरसेवक असून दोघांनी राजीनामा न दिल्याने पक्षातील गटबाजी समोर आली आहे.
खडसे यांनी नैतिकतेचा मुद्दा पुढे करत शनिवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शहरासह जिल्ह्य़ात त्याचे पडसाद उमटले. खडसे समर्थकांकडून काही ठिकाणी रास्ता रोको, जाळपोळ असे प्रकार करण्यात आले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी मात्र राजीनाम्याचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला. महापालिकेत भाजपमध्ये खडसे समर्थक नगरसेवकांची संख्या अधिक आहे. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ १३ नगरसेवकांनी पक्षाचे महानगर प्रमुख आमदार सुरेश भोळे यांच्याकडे आपले राजीनामे सोपविले. अश्विन सोनावणे, सुचिता हाडा या दोन नगरसेवकांनी मात्र राजीनामा देण्यास नकार दिला. खडसे यांनी राजीनामा दिला असला तरी पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याने पक्षनिष्ठा म्हणून राजीनामा देणार नसल्याचे हाडा यांनी नमूद केले.

शिवसेनेच्या भूमिकेवरून भाजपमध्ये संताप
भोसरीतील जमीन प्रकरणातून अखेर हकालपट्टी झालेले एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेत साजरा झालेला जल्लोश भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. एकूणच शिवसेनेतून खडसे प्रकरणी व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांबद्दल भाजपमध्ये संताप व्यक्त होत असून सत्तेत सहभागी असलेली शिवसेना भाजपविरुद्ध आगीत तेल ओतत असल्याची भावना भाजपमध्ये व्यक्त होत आहे.