आरोग्य विभागातील १३ वैद्यकीय अधिकारी कार्यमुक्त

नाशिक : सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याच्या निर्णयाचे सर्वत्र पडसाद उमटत असताना तत्पूर्वीच निवृत्तीची ५८  वर्षे पूर्ण करणाऱ्या नाशिक विभागातील १३ वैद्यकीय अधिकाऱ्यांना फटका बसला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या संदर्भातील चित्र स्पष्ट होऊन निवृत्तीचे वय ६० झाल्यास हे १३ अधिकारी पुन्हा सेवेत आले तरी त्यांना वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा संचालनालयातील संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सा, जिल्हा आरोग्य अधिकारी, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी यापैकी ३१ मे रोजी ज्यांनी वयाची ५८ वर्षे पूर्ण केली असली तरी ज्यांचे वय ६० पेक्षा कमी आहे असे वैद्यकीय

अधिकारी आणि डॉक्टरांना निवृत्त न करता त्यांचे निवृत्तीचे वय ६० पर्यंत वाढविण्यात यावे, असा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला आहे. या संदर्भात २४०

वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांची यादी मंत्रिमंडळाकडे देण्यात आली, परंतु सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने आचारसंहितेमुळे याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही.

या कालावधीत जे अधिकारी किंवा डॉक्टर सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांना कायम ठेवण्यात यावे असे पत्राद्वारे आरोग्य विभागाला कळविण्यात आले आहे. या निर्णयामुळे नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे,

मालेगाव येथील किशोर डांगे, सिलवंत यांना आपली सेवा पूर्ववत ठेवता आली.

मुळात आरोग्य विभागाला रिक्त पदाचा प्रश्न भेडसावत असतांना नाशिक विभागातील १३ वैद्यकीय अधिकारी तसेच डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. यातील काही अधिकाऱ्यांचे

वय ५८ वर्षे दोन ते सहा महिने असे असताना सरकारी निर्णयाच्या निर्णयाने ते सेवेस पात्र ठरत असतानाही कार्यमुक्त करण्यात आल्याने त्यांनी या विरोधात मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या संदर्भात लवकरच सुनवाई होईल.

सेवेत रुजू झाल्यानंतर या अधिकारी आणि डॉक्टरांना तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. सेवा पूर्ववत करणे, कारणे दाखवा आदी तांत्रिक मुद्दय़ांसह त्यांचे वेतन आणि अन्य सेवा थांबविण्यात येतील. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास साधारणत एक ते दीड वर्षांचा लागणारा कालावधी पाहता यातील काही मंडळी नियमानुसार सेवानिवृत्त होऊन जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

याविषयी आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत आवश्यक कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.

कार्यमुक्त अधिकारी

नाशिक जिल्हा रुग्णालयाचे अनिल नांदोडे, प्राथमिक आरोग्य केंद्र  वेहेळगाव येथील अरविंद माहुलकर, चांदोरी येथील मुकूंद सवाई, जळगाव प्रशिक्षण पथकाचे भाऊराव पाटील, जळगाव तालुका आरोग्य अधिकारी यावलचे हेमंत बऱ्हाटे, जयवंत काटकर, मुरलीधर झट्टीवार, धुळे येथील जयवंत बोरसे, राजेंद्र अहिरराव, प्रभाकर पवार, अहमदनगर येथील शैलजा ठाकूर,चंद्रकांतसिंग परदेशी, भाऊसाहेब बोंडवे यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.