बहुसंख्य ठिकाणी दहापेक्षा अधिक उमेदवार
महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. परंतु या माघारीसाठी जशी विनवणी करण्यात आली त्याच प्रमाणात दमदाटीचाही प्रकार घडल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून करण्यात आल्या. असे प्रकार होणार असल्यामुळे काही बंडखोरांनी त्याची दक्षता बाळगून मुदत संपुष्टात येईपर्यंत भूमिगत होण्यातच धन्यता मानली. दरम्यान बहुसंख्य प्रभागात दहापेक्षा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले असून काही प्रभागात चौरंगी तर काही प्रभागात बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एबी फॉर्मच्या घोळामुळे काही प्रभागात राजकीय पक्षांचा अधिकृत उमेदवार नाही तर काही जागांवर अपक्षांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते.

महापालिका निवडणुकीत छाननी प्रक्रियेत १२२ जागांसाठी १३१५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचे स्पष्ट झाले होते. सोमवार व मंगळवार ही माघारीची मुदत होती. पहिल्या दिवशी एकूण ६६ उमेदवारांनी माघार घेतली. दुसऱ्या दिवशी बंडोबांना शांत करण्याची धडपड शिवसेना, भाजप व इतर पक्षीय उमेदवारांकडून सुरू होती. निवडणुकीत इच्छुकांमध्ये संचारलेला उत्साह राजकीय पक्षांकडून उमेदवार यादीला झालेल्या विलंबामुळे काहीसा कमी झाला. त्यात डावलले गेल्याची भावना बळावल्याने ऐनवेळी इतर पक्षाकडून उमेदवारी मिळविणे अथवा थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे. त्यातही एबी फार्मच्या घोळामुळे निर्माण झालेल्या त्रांगडय़ाने शिवसेनेवर दहा उमेदवारांना पुरस्कृत करण्याची वेळ आली. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला एकेक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे बंडखोर वा प्रबळ अपक्षामुळे आपल्या हक्काच्या मतदानावर परिणाम होऊ नये याची दक्षता बहुतेक घेताना दिसले. साम, दाम, दंड व भेद नीतीचा अवलंब करत बंडखोरांना थोपविण्याचे प्रयत्न झाले. काही प्रभागात अर्थपूर्ण चर्चेतून मार्ग शोधले गेल्याची वदंता आहे. पक्षात महत्त्वाची पदे देण्याचे आश्वासन देण्यात आले.

माघारीच्या प्रयत्नांना काही ठिकाणी यश आले तर काही जागांवर बंडखोर कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. उलट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून माघारीसाठी दबाव येईल याचा अंदाज घेऊन ते गायब झाले. बरीच शोधाशोध करूनही सकाळपासून न सापडलेले काही उमेदवार दुपारी तीनची वेळ टळून गेल्यावर अकस्मात प्रगट झाले. माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर १२२ प्रभागातील अंतिम चित्र स्पष्ट झाले. बोटावर मोजता येतील, अशा काही प्रभागातील जागांवर तिरंगी व चौरंगी लढत होतील. बहुतांश ठिकाणी उमेदवारांची संख्या किमान सहा व त्याहून अधिक राहणार आहे. काही प्रभागात हा आकडा १० ते १२ हून अधिक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपकडून धमकावल्याचा आरोप

प्रभाग क्रमांक १६ मधून माघार घ्यावी यासाठी भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी धमकावल्याचा आरोप अक्षरश: डोळ्यात पाणी आणून रेखा दाणी यांनी केला. या प्रभागात भाजपकडून आपणास तिकीट दिले जाणार होते. अखेरच्या क्षणी आर्थिक देवाणघेवाणीद्वारे तिकीट कापण्यास आल्याची तक्रार त्यांनी केली. आपण अपक्ष अर्ज भरला होता. परंतु, हा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. पालिकेच्या विभागीय कार्यालयात पतीसमवेत आल्यानंतरही माघारीचा अर्ज भरण्याची दाणी यांची तयारी नव्हती. यावेळी त्यांच्या पतीने माघारीचा अर्ज फाडला. नंतर मात्र नव्याने अर्ज भरून माघार घेण्यात आली. या संदर्भात आमदार फरांदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दाणी यांना आपण ओळखतही नसल्याचे सांगितले. त्यांच्याशी कोणत्याही स्वरूपाचे बोलणे झाले नाही. भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवारांना पदाधिकाऱ्यांनी माघार घेण्याची विनंती केल्याचे त्यांनी नमूद केले.

बडगुजर, भोर यांची माघार

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ मधून शिवसेनेचे दीपक बडगुजर आणि भूषण देवरे यांनी माघार घेतली. दीपक हे शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे पुत्र आहेत. शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार ही माघार घेतली गेली. प्रभाग क्रमांक २६ मध्ये भाजपला धक्का बसला. प्रभाग क्रमांक २६ मधून पक्षाचे नगरसेवक सचिन भोर यांनी माघार घेतली. माकपने चिन्ह न देता केवळ पुरस्कृत केल्याने नाराज झालेल्या भोर यांनी माघार घेतली.