29 September 2020

News Flash

नाशिक महापालिकेचे १३५८ कोटींचे अंदाजपत्रक सादर

स्थानिक संस्था कराच्या अंमलबजावणीनंतर उत्पन्नात झालेल्या घटाचे परिणाम अंदाजपत्रकावर दिसत आहेत.

नाशिक महापालिकेच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात संभाव्य जमा आणि खर्चाचा मांडलेला ताळेबंद.

आर्थिक संकट टाळण्यासाठी पाणीपट्टी, मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव
पाणीपट्टी आणि मालमत्ता करात पुन्हा एकदा वाढ सुचवत पालिका आयुक्तांनी नाशिक महापालिकेचे २०१६-१७ या वर्षांसाठी १३५८ कोटींचे अंदाजपत्रक शुक्रवारी स्थायी समितीसमोर सादर केले. आर्थिक सुधारणांकडे सकारात्मकपणे न पाहिल्यास महापालिका डबघाईला येऊ शकते असे अप्रत्यक्षपणे सूचित करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या अंदाजपत्रकाचा आकार ८० कोटीने कमी झाला. सद्यस्थितीत पालिकेवर आतापर्यंतचे एकूण ७६२ कोटींेचे दायित्व असून त्यात चालु कामांसाठीच्या १७७ कोटींचा समावेश आहे. या वर्षांत ४५ कोटींचे कर्ज काढण्यात येईल. या अंदाजपत्रकावर सोमवारी चर्चा आहे.
स्थानिक संस्था कराच्या अंमलबजावणीनंतर उत्पन्नात झालेल्या घटाचे परिणाम अंदाजपत्रकावर दिसत आहेत. या वर्षांत पालिकेने स्वत:च्या उत्पन्नातून ११०८ कोटी, अनुदाने १८ कोटी, संकीर्ण इतर उत्पन्न २४ कोटी, कर्ज ४५ कोटी असे एकूण १३५८ कोटीचे उत्पन्न गृहीत धरले आहे. विकास कामांवरील देखभाल व दुरुस्तीचा खर्च, महसुली खर्च, वेतन आदींमुळे महसूली खर्चात वाढ होईल. कर्मचारी वेतनावर ३१२ कोटी, निवृत्ती वेतन ६०, शिक्षण समिती ४६, कर्ज मुद्दल व व्याजावरील परतफेड ४० कोटी आणि देखभाल, दुरुस्ती खर्च व कार्यालयीन खर्च ३२५ असा एकूण ७८३ महसूली खर्च गृहीत धरण्यात आला आहे. महापालिका तिजोरीवर पडणारा आर्थिक बोजा लक्षात घेऊन काही प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरीत करा या तत्वावर देण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने खत प्रकल्प बीओटीवर देण्याची प्रक्रिया सुरू असून कचऱ्यापासून वीज निर्मिती हा पथदर्शी प्रकल्पही राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला कोणतीही भांडवली गुंतवणूक करावी लागणार नाही. या प्रकल्पातून पालिकेला दरमहा ९९ हजार युनिट वीज मोफत मिळणार आहे. मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेंतर्गत शासन अनुदानाव्यतिरिक्त ३० टक्के रक्कम व मंजूर रकमेपेक्षा निविदा दरानुसार होणारा खर्च पालिकेला करावा लागणार आहे. त्यासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्थानिक संस्था कराच्या उत्पन्नात शासनाकडून सहाय्यक अनुदान मिळेल असे गृहित धरून ३९० कोटींची तरतूद केली आहे. सिंहस्थ आराखडय़ातील ५५२ कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले असून उर्वरित १३८ कोटी प्राप्त होणे बाकी आहे. मंजूर आराखडय़ात उर्वरित २३० कोटी अधिक जादा निविदा दर आणि दरवाढ यासाठी महापालिका निधी द्यावा लागणार आहे. त्यासाठी ३० कोटी रुपये रक्कम कर्जाद्वारे उभारली जाईल. या व्यतिरिक्त पालिकेला ५० कोटींची रक्कम स्व निधीतून उभारावी लागेल. जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेसाठी आवश्यकतेनुसार कर्ज उचलण्याचे संकेत अंदाजपत्रकात देण्यात आले आहेत.

वित्तीय सुधारणा न झाल्यास स्मार्ट सिटीतून वगळण्याची शक्यता
शहरातील विविध भागातील रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्या ठिकाणी महापालिका सेवा सुविधा उपलब्ध करत आहे. या परिसरात मालमत्ता कराचे दर वाढविणे आवश्यक आहे. शहरात मॉल, तारांकित हॉटेल यांची संख्या वाढत आहे. अशा मिळकतींना इतर महापालिकांप्रमाणे विशेष दराने आकारणी करणे आवश्यक आहे. शासनाच्या लेखा परीक्षणातही मालमत्ता करात वाढ न केल्याबद्दल आक्षेप नोंदविले गेले आहेत. रस्ते, गटार, पाणी आदींवर मोठय़ा प्रमाणात देखभाल दुरुस्ती खर्च होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मालमत्ता करात वाढ आयुक्तांनी सुचविली आहे. वीज दर आणि पाणी पुरवठय़ातील वाढीमुळे भांडवली खर्चाचे प्रमाण वाढून पाणी पुरवठय़ापासून मिळणारे उत्पन्न मिळत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात अशाच स्वरुपाच्या अटी शर्ती टाकल्या जाऊ शकतात. त्यामुळे प्रस्तावित वित्तीय सुधारणा न केल्यास

केंद्र सरकारच्या प्रकल्पातून नाशिक महापालिकेस वगळले जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आयुक्तांनी सूचित केले आहे. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ करण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे
’जीआयएस मॅपिंग पध्दतीने मिळकतींचे सर्वेक्षण
’कागदरहित कामकाजासाठी संगणकीकरण
’महिलांसाठी रस्त्यालगत प्रसाधनगृह
’लेखा परीक्षणाद्वारे पाण्याचा हिशेबबाह्य वापर कमी करणे
’राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तरतूद

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 1:34 am

Web Title: 1358 crore budget of nashik municipal corporation presented
Next Stories
1 विविध उपक्रमांद्वारे स्वा. सावरकरांना अभिवादन
2 पाण्याचा अपव्यय केल्यास जबर दंड ठोठावण्याची तयारी
3 ‘विज्ञान सर्कस’द्वारे सिद्धांतांचे सुलभीकरण
Just Now!
X