भोंदू बाबाच्या धमकीमुळे मुलीकडून १४ लाखाची चोरी

भोंदू बाबांचे कारनामे वारंवार समोर येत असूनही ग्रामीण भागातील अशिक्षितांबरोबर शहरी भागातील सुशिक्षित वर्गही त्यांच्या आहारी जात असल्याची अशीच एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. गृह शांती आणि कौटुंबिक कलह मिटविण्यासाठी एका मुलीकडून १५ लाख रुपयांचे दागिने उकळण्याचा  तसेच त्या मुलीला धमकावत तिच्याकडून चोरी करून घेण्याचा प्रकार  घडला असून याप्रकरणी भोंदूबाबाला कल्याण येथून पोलिसांनी अटक केली आहे.

१० नोव्हेंबर रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असणारे नितीन फिरोदिया यांच्या घरातून १४ लाख रुपयांची रोकड आणि १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास झाले होते. या प्रकरणाच्या तपासात फिरोदिया यांच्या मैत्रिणीच्या मुलीने ते घेतले असल्याचे निष्पन्न झाले. हे दागिने मुलीच्या आई-वडिलांनी नितीन फिरोदिया यांना परत दिले. या मुलीला विश्वासात घेऊन तिने असे का केले, याची पालकांसह पोलिसांनी चौकशी केली असता तिच्याकडून मिळालेल्या माहितीने सर्वाना धक्का बसला. या संदर्भात विरेंद्र मुथा यांनी पोलिसात तक्रार दिली.

तक्रारदार मुथा यांचे काही कौटुंबिक वाद आहेत. शरणपूर रस्त्यावर त्यांचे औषधाचे दुकान आहे. दुकानात सुतार कामास आलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुथा यांची ठाणे जिल्ह्यतील अंबरनाथच्या वांगणी येथील उदयराज रामआश्रम पांडे या भोंदू बाबाशी भेट झाली. बाबाच्या सांगण्यावरून मुथा यांनी गृहशांती आणि कौटुंबिक कलह मिटविण्यासाठी पूजा केली. त्यापोटी एक लाख १० हजार रुपये बाबाला दिले. पूजा करताना वारंवार दिवा विझला. दिवा विझणे म्हणजे अपशकून असे सांगत  बाबाने मुथा कुटुंबियांना घाबरवणे सुरू केले. तो दिवा घरात ठेवण्याची सूचना केली. तक्रारदाराच्या आईने असा दिवा घरात ठेवणे योग्य नसल्याचे सांगून तो पूजेसह बाबाला न विचारता बाहेर टाकला.

या प्रकाराची माहिती उदयराज पांडेला समजल्यानंतर त्याने तक्रारदाराच्या मुलीला घाबरविण्यास सुरुवात केली. अर्धवट पूजा टाकल्याने तुझे वडील मरतील. त्यांना जिवंत ठेवायचे असेल तर आपणास काही पूजा कराव्या लागतील. त्यासाठी पैसे घेऊन ये अन्यथा मुलीसह वडिलांना जिवे ठार मारील, पूजा करून मुलीसह कुटुंबियांची बरबादी करील, असे धमकावले. दबाव तंत्राद्वारे तांत्रिक बाबाने मुलीकडून चार लाख रुपये, १५ तोळे सोन्याच्या बांगडय़ा, दागिने, पोत, बिस्किट वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी घेतले. हे पैसे कमी पडत असल्याचे सांगून नंतर बाबाने मुलीला फिरोदिया यांच्या घरात चोरी करण्यास भाग पाडले. तांत्रिक बाबांच्या भूलथापांना बळी पडून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी अमानुष, अनिष्ट-अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक आणि उच्चाटन कायद्यान्वये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अंबरनाथ येथून संशयित तांत्रिक बाबा उदयराज पांडेला अटक केली. बाबाच्या अटकेमुळे भविष्यात अनेक मुलींचे आयुष्य आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून बचावले आहे. या तपासाची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली.

वडिलांना वाचविण्यासाठी..

औषधाचे दुकान चालविणारे तक्रारदार कुटुंब सुशिक्षित आहे. गृहशांती-कौटुंबिक कलह मिटविण्यासाठी त्यांनी पूजेचा मार्ग अनुसरला. त्यावेळी उदयराज पांडे या भोंदू बाबाने कुटुंबातील सदस्यांची नस ओळखली. पूजेवेळी दिवा विझल्याच्या मुद्यावरून त्याने तक्रारदाराच्या मुलीला घाबरविणे सुरू केले. तांत्रिक बाबाचे न ऐकल्यास वडिलांचा मृत्यू होईल या भीतीपोटी युवतीने घरातील चार लाख रुपये आणि १५ लाखाचे सोन्याचे दागिने बाबाच्या स्वाधीन केले. इतकेच नव्हे तर, परिचितांच्या घरातील रोकड आणि सोने लंपास करण्यापर्यंत मजल गाठली. या सर्वाचा कर्ता करविता तांत्रिक बाबा असल्याचे तपासात उघड झाले आहे.