‘कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता

नाशिक : देशासह राज्यातील काही भागात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत असताना सुरगाणा तालुक्यातील काही भागात १२ ते १५ कावळे मृत झालेले आढळल्याने स्थानिकांसह कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या कावळ्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.

सुरगाणा तालुक्यातील उंबरदे परिसरात १२ ते १५ कावळे मृतावस्थेत आढळून आले. एका झाडावरून कावळ्यांचा बराच आवाज येत होता. तिथे पाच ते सात कावळे मृतावस्थेत पडले होते. गावातील लहान मुलांनी खेळताना काही कावळे नदीत फेकून दिल्याचे सांगितले जाते. काही ग्रामस्थांनी याची माहिती पशुधन अधिकाऱ्यांना दिली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, तालुका पशुधन अधिकारी डॉ. ललिता नाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतावस्थेत आढळलेले कावळे ताब्यात घेऊन त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी अथवा गुरूवारी येणे अपेक्षित असल्याचे डॉ. गर्जे यांनी सांगितले. कावळ्यांच्या मृत्यूमुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बर्ड फ्लूच्या सावटामुळे आधीच अंडी आणि चिकन विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. त्यात आजाराचे सावट जिल्ह्यावर आल्याच्या धास्तीने विक्रीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विक्री थंडावली असताना बर्ड फ्लूपासून कोंबडय़ांचे संरक्षण करण्याची

कसरत व्यावसायिकांना करावी लागत आहे. डॉ. गर्जे यांनी बर्ड फ्लू हा माणसांचा आजार नसून पक्ष्यांचा आजार आहे, हा आजार पक्ष्यांनाच हानीकारक आहे. त्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो. चिकन आणि अंडी ८० ते १०० अंशापर्यंत तापमानात शिजवून खाल्ल्यास त्याचा मानवाला काही धोका नाही, असे नमूद केले. बर्ड फ्लू आजारासंबंधी पसरणाऱ्या अफवांमुळे भीतीला खतपाणी घातले जाते. परंतु, नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला.

कुक्कुटपालन केंद्रात येण्यापासून स्थलांतरित पक्ष्यांना रोखा

स्थलांतरित पक्ष्यांव्दारे बर्ड फ्लूचा फैलाव होतो. त्यामुळे कावळे, चिमण्या, बदक, घार, साळुंख्या अशा स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना कुक्कुटपालन केंद्रात येण्यापासून रोखल्यास या आजाराचा प्रादुर्भाव रोखता येईल. तसेच जैविक सुरक्षेला प्राधान्य देऊन कुक्कुटपालन क्षेत्रात साफसफाई, निर्जंतुकीकरण, विलगीकरणाची व्यवस्था ठेवल्यास कुक्कुटपालन व्यावसायिकांचे नुकसान कमी होण्याची शक्यता आहे.

डॉ. विष्णू गर्जे (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद)

मृत पक्षी आढळल्यास काय कराल?

आपल्या भागात मृत पक्षी आढळल्यास तातडीने पशु संवर्धन विभाग अथवा आपल्याजवळील पशु वैद्यकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. विभागाचे कर्मचारी येऊन त्या पक्ष्यांचे नमुने घेऊन त्यांची विल्हेवाट लावतील. तसेच नमुने तपासणीसाठी पुणे किंवा भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवतील, जेणेकरून पक्ष्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.