नाशिक : टाळेबंदी वाढविण्यात आल्यावर मिळेल तो पर्याय स्विकारत परप्रांतीय मजूर, कामगारांनी घरचा रस्ता धरला आहे. चांदवडजवळील राहुड घाटात सोमवारी सकाळी तीन मालमोटार आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात उत्तरप्रदेश, बिहारच्या दिशेने निघालेले १७ जण जखमी झाले. या अपघातामुळे राहुड घाटात काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याने तीन ते चार किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुंबईहून उत्तर भारतीय मिळेल त्या वाहनाने आपल्या घरी परतत आहेत. राज्य परिवहनने राज्याच्या सीमेपर्यंत परप्रांतियांना बसव्दारे मोफत नेण्याची व्यवस्था केली असली तरी पुढील प्रवास कसा करणार, म्हणून अनेक जण मालमोटारीतून प्रवास करीत आहेत. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गाने राहुड घाटातून तीन मालमोटार आणि एक स्विफ्ट गाडी जात होती. घाटात गाडीने अचानक वेग कमी केल्याने मालमोटार गाडीवर जाऊन आदळली. पाठीमागील इतर दोन्ही मालमोटार या अपघातग्रस्त वाहनांना चुकविण्याच्या नादात दुभाजक तोडून या वाहनांवर जाऊन आदळल्या.

या अपघातात वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. टोलनाक्यावरील कर्मचारी तातडीने अपघातस्थळी पोहचले. तसेच चांदवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक हिरालाल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातात जिवितहानी झाली नसली तरी वेगवेगळ्या वाहनांमधील १७ प्रवासी जखमी झाले. अपघातग्रस्तांना तातडीने १०८ रुग्णवाहिका तसेच टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने चांदवड तसेच मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली. दोन प्रवाश्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. इतरांना किरकोळ दुखापती झाल्याचे पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान, अपघातग्रस्त वाहनांमुळे घाट परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडचणी आल्या. याशिवाय वाहनांच्या तीन ते चार किलो मीटपर्यंत रांगा लागल्या. अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात तीन ते चार तासांचा कालावधी लागला.