विद्वत परिषदेच्या बैठकीमध्ये निर्णय
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दृष्टिबाधित आणि श्रवणबाधित विद्यार्थ्यांसाठी बि. एड. सुरू करण्यासह २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर असे एकूण १८ शिक्षणक्रम नव्याने सुरू करण्यात येणार आहेत.
विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची बैठक गुरूवारी झाली. यावेळी हे निर्णय घेण्यात आले. सद्यस्थितीत विद्यापीठाचे १७४ शिक्षणक्रम सुरू आहेत. जवळपास ३६ शिक्षणक्रम मध्यंतरी विविध कारणास्तव बंद करावे लागले. या स्थितीत नवीन शिक्षणक्रम सुरू करण्याची परंपरा कायम राहिल्याचे अधोरेखीत होत आहे.
कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली विद्वत परिषदेची बैठक झाली. नवीन अभ्यासक्रमात आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत प्रमाणपत्र-पदविका क्रीडा वैद्यकशास्त्र (स्पोर्ट मेडिसीन), डायलेसिस वैद्यकीय सहाय्यक, पुण्याच्या भारत विकास शिक्षण संस्थेच्या सहकार्याने बीएएमएस नंतर पदव्युत्तर प्रमाणपत्र सुरू करण्याबाबत कायाचिकित्सा (जनरल मेडिसिन-आयुर्वेद), स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्र (गायनाकॉलॉजी आणि ऑबस्टेट्रिक्स) कौमारभृत्य (चाईल्ड हेल्थ – आयुर्वेद) या शिक्षणक्रमांचा समावेश आहे. मानव विद्या व सामाजिकशास्त्रे विद्या शाखेंतर्गत एमए – अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एम. ए. मास कम्युनिकेशन जर्नालिझम शिक्षणक्रम, बी. ए. लोकसेवा व एम. ए. लोकसेवा, एमएसडब्लू, बी. ए. लिबरल आर्ट शिक्षणक्रम नव्याने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना पर्यावरणशास्त्राची ओळख, माहिती व्हावी म्हणून पर्यावरणशास्त्र विषयाच्या अध्ययन साहित्याचा हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत अनुवाद करणे, विद्यार्थ्यांना संवादपत्रिका संकेत स्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.
यशवंतराव चव्हाण स्मृती संग्रहालयाची निर्मिती करून त्यात अद्ययावत ग्रंथालय, चित्रे, पूर्वज, परिवार, बालपण व शिक्षण, स्वातंत्र्य चळवण, सहभाग, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, साहित्य संपदा यासारख्या अनेक बाबींचा अंतर्भाव करण्याचे निश्चित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासात मुक्त विद्यापीठाचा सहभाग कसा वाढविता येईल याबाबत लक्ष्मीकांत देशमुख यांनी सूचना केल्या. क्रीडा वैद्यकशास्त्र शिक्षणक्रम सुरू करण्यासाठी बालेवाडीच्या क्रीडा अकादमीचे सहकार्य घेण्याची सूचना केली.