१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि फरार असलेल्या टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमन याचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील कारागृहात युसूफ मेमनचा मृत्यू झाला. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप कळलं नसल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह धुळे येथे पाठवण्यात आला आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

युसूफ मेमनला २००७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुरुवातीला त्याला मुंबईमधील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं होतं. नंतर त्याला नाशिक जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. युसूफ मेमनवर मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचण्याचा आरोप होता.

१२ मार्च १९९३ रोजी दोन तास १० मिनिटांमध्ये मुंबईत एकामागोमाग एक १३ बॉम्बस्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटात २५७ लोक ठार झाले होते. तर १४०० लोक जखमी झाले. बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि त्याचा भाऊ युसूफ मेमनसहित इतरांचं नाव आलं होतं. बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांनी भारत सोडून पळ काढला होता.