नाशिक : शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील टाकीतून प्राणवायूची गळती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयाने तातडीने झाकीर हुसेन रुग्णालयात २० प्राणवायूचे सिलेंडर पाठविल्याने इतर रुग्णांचा प्राण वाचू शकला.

घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाकडे सिलेंडरच्या मागणीसंदर्भात विचारणा होताच त्यांच्या साठय़ातील प्राणवायूने भरलेली १५ सिलेंडर त्वरेने देण्यात आली. परंतु सिलेंडरची गरज अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय ज्या कंपनीकडून प्राणवायूची खरेदी करते, त्यांच्याकडून थेट सिलेंडर घेण्याची सूचना करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आधी १५, नंतर तीन तसेच साठय़ातील दोन अशी २० सिलिंडर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयास पाठविण्यात आली.

गॅसगळतीनंतर दोन तास रुग्णालय व्यवस्थापन तसेच प्रशासनाची धावपळ उडाली. रुग्णांचा जीव टांगणीला लागला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आवाहन रुग्णालयासमोर होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेला सिलेंडरचा साठा तसेच गळती झालेल्या टाकीत पुन्हा प्राणवायू भरत काम सुरू करण्यास काही प्रमाणात विलंब झाला. या कालावधीत रुग्णांच्या नातेवाईकांनी मिळेल तेथून सिलेंडर मिळविण्याचा प्रयत्न के ला. कोणी खुर्चीवर आपल्या रुग्णाला बसवीत तर काहींनी रुग्णालयाच्या आवारात रुग्णाला बसवीत कॉन्सन्टेटरच्या माध्यमातून प्राणवायू देण्याची व्यवस्था केली. काही नातेवाईकांनी आपल्या रुग्णास तेथून तातडीने हलवत अन्य खासगी रुग्णालयात, महापालिके च्या इतर रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात केली.